सातारा – शाहूपुरी येथे शिवप्रतिमेच्या पालखी मिरवणुकीने शाहूपुरी शिवजयंती महोत्सवास दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. त्या पालखीच्या भोई बनल्या होत्या.
गेंडामाळ नाक्यावरील श्री मारुती मंदिरापासून निघालेल्या या शाही मिरवणुकीच्या प्रारंभी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर यांच्या हस्ते पालखीतील शिवप्रतिमेचे पूजन मावळ्यांच्या साक्षीने, ढोल-ताशा व तुतारींच्या निनादात झाले. “जय भवानी जय शिवाजी’ अशा जयघोषात पालखी सोहळ्यास सुरुवात झाली.
पालखी सोहळ्यात अश्वारुढ असलेल्या राजमाता जिजाऊ, बाल शिवाजी, मावळ्यांच्या वेशभूषेतील मुले-मुली, लेझीम, झांजपथक, ढोल-ताशे व तुताऱ्यांच्या निनादाने अवघे आसमंत शिवमय झाले होते. पालखी मिरवणूक मार्गावर जागोजागी सुवासिनींनी आपापल्या घराच्या दारात सडारांगोळ्या काढून शिवप्रतिमेचे पूजन केले.
मिरवणूक शाहूपुरी चौकात येताच झांजपथकातील शिवमावळ्यांनी सुंदर देखावे व कसरतींचे दर्शन घडविले. त्यानंतर पालखी व्यासपीठावर ठेऊन शिवपुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. धनंजय खोले यांनी सादर केलेल्या शिववंदनेनंतर शिवछत्रपतींच्या जयघोषाने सकाळच्या सत्रातील सोहळ्याची सांगता झाली.
भारत भोसले, ग्रामपंचायत सदस्य सौ. शोभा केंडे, राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव, सौ. नीलम देशमुख, सुहास वहाळकर, माधवी शेटे, नितीन तरडे, प्रा. डॉ. सुजित जाधव, बाळासाहेब निकम, संकेत परामणे, विकास देशमुख, गजानन इंगळे, वैशाली जाधव, सौ. शुभांगी क्षीरसागर, जगदीश भोसले, नवनाथ कांबळे, महेश जांभळे, महेंद्र गायकवाड, हणमंतराव पालेकर, सुरेश शेटे, सुमित शेटे, अजय भोसले उपस्थित होते. शाहूपुरी चौकात सायंकाळी बालशाहिरांनी पोवाडे सादर केले आणि “सन्मान कर्तृत्वाचा’ हा कार्यक्रम झाला. शिवजयंतीनिमित्त शाहूपुरीतील वातावरण शिवमय झाले होते.