तत्कालीन नायब तहसीलदार, उपनिबंधकासह 24 जणांविरुद्ध गुन्हा
श्रीगोंदा – मयत ट्रस्टी महिलेच्या जागी दुसऱ्या महिलेला दाखवून 3 एकर 9 गुंठे जमीन हडपल्याचा प्रकार तालुक्यातील बेलवंडी कोठार येथे घडला. या प्रकरणी ट्रस्टचे सचिव चंद्रकांत काशीनाथ ढमढेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन नायब तहसीलदार, तत्कालीन उपनिबंधक यांच्यासह साक्षीदार, तत्कालीन तलाठी, मंडलाधिकारी अशा एकूण 24 जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दिलेल्या फिर्यादीत ढमढेरे यांनी म्हटले आहे की, ट्रस्टी मयत आहेत, हे माहिती असून सुद्धा फिर्यादीत सर्व लोकांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मयत ट्रस्टीच्या जागी दुसऱ्यालाच उभे करून बनावट बेकायदेशीर दस्तऐवज तयार केले. बनावट ओळखपत्र, बोगस सह्या व अंगठ्याच्या आधारे सदर ट्रस्टची गट नं 728 मधील जमीन बळकावून फिर्यादी व ट्रस्टची फसवणूक करण्यात आली आहे, असे ढमढेरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गौतमचंद पुनमचंद बाठिया (रा. माणिकनगर, स्टेशनरोड, अ.नगर), सुभाष अर्जुन पवार (रा. बेलवंडी शुगर), नायब तहसीलदार महेश खेतमाळीस (रा.श्रीगोंदा), विजय मोरे (रा.श्रीगोंदा), रामदास थोरात (रा. लोणीव्यंकनाथ), राजू कोरे (रा.मढेवडगाव), चंद्रकांत शिनलकर (व्यवस्थापक बालाजी नागरी पतसंस्था, श्रीगोंदा), अन्सार शेख (रा श्रीगोंदा), अभिजित रेपाळे (रा.पारगाव सुद्रीक), अजित काकडे (रा. लोणीव्यंकनाथ, खरेदी घेणार), रामदास शेलार (रा.बेलवंडी), सतीश लगड (रा.कोळगाव), किशोर पवार (रा.बेलवंडी स्टेशन), नाना सय्यद (रा. रेल्वेस्टेशन, श्रीगोंदा), मोहन डांगे (रा. श्रीगोंदा कारखाना), सचिन भडांगे (व्यवस्थापक श्रीगोंदा – आयडीबीआय बॅंक), बी. डी. पानसरे (कामगार तलाठी, बेलवंडी), हमशोद्दीन शेख (मंडलाधिकारी बेलवंडी), पांडुरंग निंभोरे (रा. घोटवी, विलास म्हस्के रा.लोणीव्यंकनाथ), राजेंद्र क्षीरसागर (रा.श्रीगोंदा), अजित ओसवाल (आयडीबीआय बॅंक, श्रीगोंदा), श्रीगोंदा उपनिबंधक यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करीत आहेत. यापूर्वीही असे प्रकार उघडकीस आलेले आहेत.