पाणीपट्टी वाढविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामध्ये आता पाणीपट्टीतही वाढ केली जाणार आहे. सहा हजार लिटरपर्यंत पाणी मोफत दिले जाणार आहे. 6 ते 15 हजार लिटरसाठी प्रति माह आठ रुपये, 15 ते 20 हजार लिटरपर्यंत 40 रुपये पाणीपट्टी आकारण्यात येईल. तसेच 20 हजार लिटर पुढील पाण्यासाठी 100 रुपये पाणीपट्टी दर प्रस्तावित आहे. व्यापारी पाणी वापरासाठीचा दर 55 रुपये ठरविला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.
शहरामध्ये समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. असे असले तरी प्रत्येक नळजोडावर नियंत्रण ठेवणे शक्य नाही. जलशुद्धीकरण प्रकल्पापासून जवळ असलेल्या भागामध्ये जास्त पाणी येते. तसेच उतारावरील भागामध्येही जास्त दाबाने पाणीापुरवठा होतो. जलशुद्धीकरण केंद्रापासून दूर असलेल्या भागामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी 100 एलपीसीडी पेक्षा जास्त पाणी वापर करणाऱ्या ग्राहकांवर जास्त दर लावण्यात येणार आहे. याचा विचार करून पाणीपट्टीचे सुधारित दर प्रस्तावित केले आहे. तसेच दरवर्षी सर्व प्रकराच्या दरामध्ये सर्व प्रकारच्या दरांमध्ये वार्षिक पाच टक्के वाढ प्रस्तावित करण्याचे सुचविले आहे.
सहा हजार लिटरपर्यंत पाणी मोफत दिले जाणार असून सहा ते 15 हजार लिटरसाठी आठ रुपये आणि 15 ते 20 हजार लिटरपर्यंत 40 रुपये पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. 20 हजार लिटर पुढील वापरासाठी 100 रुपये पाणीपट्टी आकारण्याचे प्रस्तावित आहे. 20 हजार लिटरपुढील वापरासाठी 100 रुपये पाणीपट्टी दर प्रस्तावित करण्यात आला आहे. व्यापारी पाणीवापरासाठी 55 रुपये दर असणार आहे. खासगी शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, शासकीय निमशासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, ऑटो क्लस्टर, औंध उरो रुग्णालयाला प्रति हजार लिटरसाठी 17 रुपये सुचविले आहेत. धार्मिक स्थळे, अनाथश्रम, वृद्धाश्रम यांना 11 रुपये, स्टेडियम 22 रुपये, महापालिका इमारती 11 रुपये अशी दरवाढ सुचविली आहे.