तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – नगर परिषदेकडून मालमत्ताकर व पाणी पट्टीची १५ मार्चपर्यंतची वसुली १८ कोटी ७३ लाख २० हजार ३४८ रुपये झाली असून नगर परिषदेचे एकूण उद्दिष्ट्ये ४२ कोटी रुपये वसुलीचे आहे. मार्च अखेर शंभरटक्के मालमत्ताकर व पाणीपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट्ये असून त्यासाठी थकीत करदात्यांवर कडक कारवाईच्या धोरणाचा अवलंब सुरु करण्यात आल्याचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी सांगितले.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये एकूण ३८ हजार मालमत्ता धारक आहेत. यामध्ये मालमत्ताकराच्या माध्यमातून नगर परिषदेस ३२ कोटी ९५ लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे. यामध्ये १५ मार्चअखेर ४४.४९ टक्के म्हणजेच १४ कोटी ६६ लाख २३ हजार १४८ रुपये मालमत्ता धारकाकडून जमा झाले असल्याचे कर अधिकारी कल्याणी लाडे यांनी सांगितले.
तर पाणी पट्टीतून नगर परिषदेस ९ कोटी ४ लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे. यामध्ये १५ मार्चअखेर ४५ टक्के म्हणजेच ४ कोटी ६ लाख ९८ हजार २०० रु जमा झाल्याचे पाणीपुरवठा कर अधीक्षक जयंत मदने यांनी सांगितले.
मार्चअखेर पर्यंत मालमत्ताकर व पाणीपट्टी वसुलीसाठी नगरपरिषदेने मालमत्ताधारकांना कर भरण्याचे आवाहन घंटागाडीद्वारे अलाउन्स करून केले आहे. तळेगाव हद्दीमध्ये एकूण ३२ मुख्य ठिकाणी बॅनरच्या माध्यमातून मालमत्ता कर भरण्याचे आवाहन केले आहे.
या गोष्टी करून देखील मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरला नाही, तर थकीत मालमत्ता धारकांचे नळ जोड बंद करणे, जंगम व स्थावर मालमत्ता सील करणे तसेच थकित मालमत्ता धारकांचे घरासमोर वाद्य वाजवणे. या कारवाई करण्यात आल्या असून आत्तापर्यत ५ प्लँट व ५ व्यावसायिक गाळ्यांना सील करण्यात असल्याचे कर अधिकारी कल्याणी लाडे यांनी सांगितले.
मालमत्ता कर वसुलीसाठी तळेगाव गावभाग व स्टेशन भाग असे दोन भाग केले असून यामध्ये दोन पथकांची गाड्यासह नेमणूक केली आहे. यामध्ये वसुलीसाठी नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश केला असून नगर परिषदेच्या सुट्टीच्या कालावधीत देखील कर भरणा सुरू असल्याचे उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी सांगितले.
कर भरून सहकार्य करा
तळेगावच्या विकासासाठी तसेच शासकीय भरघोस अनुदान प्राप्त करण्यासाठी तळेगावकर नागरिकांनी त्वरित मालमत्ता कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी एन. के. पाटील व उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी केले आहे.
वारंवार संपर्क करून सूचाना देऊनही थकीत करदात्याकडून थकीत कराची रक्कम भरणा केली जात नसल्याने आशा करदात्यांची नावे दैनिकात प्रसिध्द करण्यात येणार आहेत. – विशाल शहाणे, माहिती वसुली अधिकारी