जनजागृती करण्याची नगरसेवक संदीप वाघेरेंची मागणी
पिंपरी (प्रतिनिधी) – सध्या जगभर थैमान घालणाऱ्या “करोना’ हा विषाणू आता भारतातही दाखल झाला असून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिका रुग्णालयांमध्ये स्वतंत्र अतिदक्षता कक्ष उभा करावा. तसेच या आजारासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.
यासंदर्भात नगरसेवक वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेत निवेदन दिले आहे. यासंदर्भात बोलताना नगरसेवक वाघेरे म्हणाले की, अनेक देशांमध्ये “करोना’ व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. चीनच्या वुहान शहरातून हा जिवघेणा व्हायरस इतर देशांमध्ये पसरला आहे. अमेरिका, भारत, जापान, ऑस्ट्रेलिया, थायलंड, फ्रान्स, सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम अशा देशांमध्ये या “करोना’ व्हायरसने धुमाकूळ घातला आहे.
पिंपरी- चिंचवड शहरामध्येही असंख्य नागरिक बाहेरून दाखल होतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये “करोना’ विषाणू रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तत्काळ स्थापन करण्यात यावा तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत या विषाणूचा प्रादुर्भाव प्रतिबंध व नियंत्रणासाठी जनजागृती करून योग्य त्या उपाययोजना त्वरित राबविण्यात याव्यात.