शिरवळ – भादे (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत नीरा नदीच्या पात्रामध्ये 40 ते 45 वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा धारदार हत्याराने व दगडाने खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरुन व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भादे हद्दीतील वीर धरणाच्या कमानीलगत नीरा नदीपात्रात मृतदेह असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती नागरिकांनी शिरवळ पोलीसांना दिली.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, फलटणचे उपअधीक्षक तानाजी बरडे, खंडाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, शिरवळच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सागर अरगडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ कर्मचाऱ्यांसमवेत दाखल झाले.
मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या डोक्यात हत्याराने सपासप वार करुन व दगडाने खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी पोलीसांना रक्ताने माखलेले दगड, घड्याळ,चप्पल आढळून आली. ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु होते. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत.