नवी दिल्ली : देशभरात आज 71 वा प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. यानिमित्त राजधानी दिल्लीतील दरवर्षीप्रमाणे राजपथावर मोठ्या संचलनाच आयोजन करण्यात आले आहे. या संचलनाच्यानिमित्ताने देशाच्या लष्करी सामर्थ्याचे, सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडत असते. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारत सरकार दरवर्षी इतर देशांच्या प्रमुखांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देते. यंदा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर मेसियास बोल्सोनारो प्रमुख अतिथी म्हणून सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ख्याती आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण संविधान लागू होण्यासाठी तीन वर्ष लागली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकृत केलं आणि 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आले, तेव्हापासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 26 जानेवारीला या घटनेचे भव्य सेलिब्रेशन केले जाते, ज्यात सैन्याचे जवान परेड करतात आणि देशातील विविध रथांच्या माध्यमातून राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडते.
सकाळी साडे नऊ वाजता पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख राष्ट्रीय् समर स्मारक (नेशनल वॉर मेमोरियल) येथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहतील. यानंतर पंतप्रधान 9.45 वाजता राजपथावर जाऊन राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथींचं स्वागत करतील. ठीक 10 वाजता प्रजासत्ताक दिनाच्या परेडला सुरुवात होईल. यंदा पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान राष्ट्रीय समर स्मारकला जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहतील. याआधी अमर ज्योतच शहिदांचं समाधी स्थळ मानलं जायचं. पण 25 फेब्रुवारीला पंतप्रधानांनी राष्ट्रीय् समर स्मारक देशाला समर्पित केले होते. त्यामुळेच आता राष्ट्रीय समर स्मारकचे शहिदांचे समाधी स्थळ झाले आहे.