मुंबई – शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला सन 2014 मध्येही सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते त्यावर शिवसेनेने खुलासा केला पाहिजे अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी म्हटले आहे की चव्हाण यांचे विधान आश्चर्यकारक आहे. आणि त्यातून शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यामुळे आता शिवसेनेने यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली होती.
शिवसेनेशी वैचारीक मतभेद असताना कॉंग्रेसने त्यांच्याशी आघाडी करून सरकार का स्थापन केले असा प्रश्न चव्हाण यांना या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना चव्हाण म्हणाले होती अशी स्थिती सन 2014 मध्येही उद्भवली होती. पण त्यावेळी आपण या प्रस्तावाला विरोध केला होता असेही चव्हाण म्हणाले होते. पण यावेळची परिस्थिती वेगळी होती. भाजपने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार फोडून विरोधकांचेच अस्तित्व संपुष्ठात आणण्याचा प्रयत्न केल्याने यावेळी शिवसेनेबरोबर आघाडी करण्याविषयी आपण स्वता आग्रही होतो असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते.