गुन्हा घडतेवेळी अल्पवयीन असल्याचा केला होता दावा
नवी दिल्ली – दिल्लीतील निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपी पवनकुमार गुप्ता याने गुन्हा घडला त्यावेळी आपण अल्पवयीन होतो त्यामुळे आपली मुक्तता करावी असा दावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती. पण न्यायालयाने तरी आज फेटाळून लावली. या प्रकरणातील चारही आरोपींना 1 फेब्रुवारी रोजी फाशी दिली जाणार आहे. त्यामुळे त्याच्या आधी दाखल करण्यात आलेल्या याचिकेविषयी कुतुहल निर्माण झाले होते.
एकच मुद्दा किती वेळा उपस्थित करणार असा आक्षेप घेत कोर्टाने या आरोपींना केलेला दावा साफ फेटाळून लावला आहे. अशा स्वरूपाचा आक्षेप आता यातील कोणाही आरोपींना घेता येणार नाही असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. याच मुद्द्यावरून पवनकुमार गुप्ता याने केलेला अर्ज हायकोर्टाने या आधीच फेटाळला आहे. आज हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की संबंधीत आरोपी अल्पवयीन असल्याच्या विषयावर या आधीही चर्चा झाली आहे. त्यामुळे नव्याने या विषयावर विचार करण्याचे कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही.
या आरोपींना फाशी देण्याचा दिवस या आधी यातील एका आरोपीने केलेल्या दयेच्या अर्जामुळे टळला होता. आता त्यांना 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फाशी दिली जाणार आहे. ही तारीखही पवनकुमार गुप्ता याने केलेल्या अर्जामुळे टळणार का असे वाटत असतानाच सुप्रिम कोर्टाने ही याचिका आज निकाली काढली.
या प्रकरणी प्रतिक्रीया देताना निर्भयाच्या मातोश्रींनी म्हटले आहे की आरोपींनी मुद्दाम फाशी टाळण्यासाठी हा खोडसाळपणा चालवला आहे. पण आज दिलेल्या निकालामुळे आपण समाधानी आहोत. यातील आरोपींनी स्वतंत्रपणे दया याचिका करून वेळ घेण्यापेक्षा कोर्टाने आणि सरकारने त्या चौघांच्याही विषयी एकदाच निर्णय देऊन टाकावा अशी आपण त्यांना विनंती करीत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.दरम्यान पवनकुमार गुप्ता याचे वकिल मात्र अजूनही आपल्या दाव्यावर ठाम आहेत. त्यांनी म्हटले आहे की गुप्ता याच्या शाळेच्या दाखल्यातील नोंदीनुसार तो घटना घडली त्या दिवशी अल्पवयीनच होता. पण कोणत्याच कोर्टाने या मुद्द्याचा विचार केलेला नाही असे त्यांनी म्हटले आहे.
सरकारी वकिलांनी मात्र त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी म्हटले आहे की सुनावणीच्या प्रत्येक टप्प्यात हा विषय चर्िर्चला गेला आहे आणि त्याचा शाळेचा दाखलाही रेकार्डवर घेण्यात आला आहे. गुन्हा घडला त्यावेळी तो 19 वर्षांचा होता असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.