पुणे – बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनी गुंतविलेले पैसे परत मिळत नसल्याचे एका ६१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली आहे. डीएसके गुंतवणुकदाराने आत्महत्या करण्याची ही पहिलीच घटना आहे.
तानाजी गणपत कोरके (वय ६१, रा. भीमनगर, आंबेडकर हायस्कुलसमोर, घोरपडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. तानाजी कोरके यांना एकूण चार मुली आहेत. यातील दोन जणींची लग्न झाली आहेत. मुलींच्या लग्नासाठी गावाकडील मालकीची अडीच एकर जमीन विकली होती. यातून मिळालेले चार लाख रुपये मुलींच्या लग्नासाठी स्वत:च्या नावे तर मोठ्या मुलींच्या मुलांच्या शिक्षणासाठी ५० हजार रुपये जावई समीर मोरे यांच्या नावे २०१४ मध्ये डीएसके डेव्हलपर्सकडे गुंतवले होते. २०१७ मध्ये पैसे मिळणं अपेक्षित होतं. मात्र वारंवार पाठपुरावा करुनही पैसे मिळाले नाहीत.
तानाजी कोरके यांनी तिसऱ्या मुलीच्या लग्नासाठी उसने पैसे घेतले होते. मात्र चौथ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे. आपल्या आत्महत्येसाठी डीएस कुलकर्णी यांना जबाबदार धरण्यात यावं असंही त्यांनी लिहिलं आहे.
दरम्यान, गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेल्या डीएसके प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. चंद्रकांत बिडकर यांनी केलेल्या समझोत्यासंबंधातील अर्जानुसार न्यायालय डीएसके आणि पत्नी हेमंती यांचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे.