पुणे – पुण्याहून जयपूरला जाणाऱ्या विमानाच्या इंजिनला अचानक हादरे बसू लागल्याने मुंबई विमानतळावर विमानाचे “इमर्जन्सी लॅंडिंग’ करण्यात आले. समुद्र सपाटीपासून 27 हजार फूट उंचीवर असताना हा प्रकार घडला असून विमानात दीडशे प्रवासी होते.
इंडिगोचे पुणे-जयपूर विमान (6ई-6129) नियोजित वेळेनुसार गुरुवारी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी लोहगाव विमानतळावरून उड्डाण करून 5 वाजून 35 मिनिटांनी जयपूरला उतरणे अपेक्षित होते. नियोजनानुसार त्या विमानाचे पुण्यातून उड्डाण झाले. ते विमान जयपूरच्या दिशेने जात असताना 4 वाजून 25 मिनिटांनी विमानाच्या इंजिनला हादरे जाणवू लागले. त्यावेळी इमर्जन्सी जाहीर करून विमान चालकाने मुंबई विमानतळावर उतरविण्याचा निर्णय घेतला.
प्रवासी पर्यायी विमानाने जयपूरला रवाना
इंडिगो कंपनीचे विमान ए-320 या प्रकारातील आहे. वैमानिकाला इंजिनमध्ये तांत्रिक अडथळे जाणवू लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले. त्यानंतर, प्रवाशांना पर्यायी विमानाने जयपूरला पाठविण्यात आले. या विमानाने साडेसातच्या सुमारास उड्डाण केले. त्यानंतर, कंपनीच्या तंत्रज्ञांकडून विमानाची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती कंपनीच्या प्रशासनाने दिली.