महापालिकेचे उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे लक्ष
पुणे – वाढीव निविदांमुळे महापालिकेचा रखडलेला मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्प तसेच भामा-आसखेड प्रकल्पासह निविदा रद्द करण्यात आलेल्या एचसीएमटीआर प्रकल्पाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी पुण्यात घेणार आहेत. त्यामुळे या भामा-आसखेडसह जादा दराने निविदा आल्याने अडचणीत आलेल्या इतर दोन प्रकल्पांचा तिढा या बैठकीनंतर सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेने 2013 मध्ये भामा-आसखेड प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. 2016 मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हे काम अद्यापही 85 टक्क्यांवर अडकले आहे. तर “एचसीएमटीआर’ प्रकल्प जादा निविदांमुळे रद्द झाला असून जायका प्रकल्पाच्या चार निविदा चढ्या दराने आल्याने त्यावरूनही वाद सुरू आहे.
त्यामुळे ही योजनाही अडचणीत सापडली आहे. दरम्यान, भामा-आसखेड प्रकल्पासाठी पवार यांनी डिसेंबरमध्ये बैठक घेतली होती. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार झाल्यावर हा प्रश्न निकाली काढण्यासाठी बैठक घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर ही बैठक होत आहे. त्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून पुन्हा काम बंद असलेला हा प्रकल्प मार्गी लागण्यास महापालिकेस ही योजना पुढील सहा महिन्यांत कार्यान्वीत करून शहराला यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचा दिलासा देता येणार आहे.