मोरे यांनी अर्ज मागे घेतल्याने पद पुन्हा रिक्त : उपसभापतिपदी सुरवसे
जामखेड – जामखेड पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी राजश्री सूर्यकांत मोरे यांनी भरलेला अर्ज छाननी अगोदर काढून घेतल्याने सभापतिपद पुन्हा रिक्त राहिले आहे, तर उपसभापतिपदी मनीषा रवींद्र सुरवसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडी अगोदरच मोरे यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. मात्र त्यांच्या उत्साहावर विरज पडले.
सदर निवडणुकीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असून, पुढील निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत. तोपर्यंत उपसभापती सुरवसे या सभापतिपदाचा कार्यभार सांभाळतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जयश्री माळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जामखेड पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी 7 जानेवारी रोजी अर्ज दाखल न झाल्याने निवड प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आज निवडणूक निर्णय अधिकारी जयश्री माळी यांनी ही प्रक्रिया पुन्हा राबविली. यावेळी सभापतिपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजश्री सूर्यकांत मोरे यांनी अर्ज दाखल केला. त्यांना सूचक म्हणून विद्यमान सभापती सुभाष आव्हाड होते. उपसभापतिपदासाठी भाजप सदस्य मनीषा रवींद्र सुरवसे यांनी अर्ज दाखल केला.
त्यांना सूचक म्हणून डॉ. भगवान मुरुमकर हे होते. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झाल्याने निवडी बिनविरोध होणार, हे निश्चित झाले होते. मात्र अर्ज दाखल केल्यानंतर सभापती व उपसभापती या दोघांचे सूचक आव्हाड व मुरूमकर हे निघून गेले. त्यानंतर पंचायत समितीच्या बाहेर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
परंतु छाननी सुरू झाल्यानंतर मोरे पती-पत्नी यांनी अचानक अर्ज मागे घेतला. खऱ्या अर्थाने या दोन्ही निवडी अनोख्या पद्धतीने होणार होत्या. कारण राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, अशी आघाडी सत्तेवर आहे, तर जामखेड पंचायत समितीत भाजपचे विद्यमान सभापती सुभाष आव्हाड, डॉ. भगवान मुरुमकर, भाजपचे तालुका अध्यक्ष रवी सुरवसे हे तीन सदस्य आहेत.
पूर्वी भाजपचे सदस्य असलेल्या उपसभापती राजश्री मोरे या पती-पत्नींनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यांनीच सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांना भाजपचे विद्यमान सभापती सुभाष आव्हाड हे सूचक होते. जसे राज्यातील नेते सोयीप्रमाणे राजकारण करतात, तोच कित्ता गिरवत या दोन्ही निवडी होणार, हे निश्चित झाले होते.