इंदापूर येथे चंद्रकांत पाटील यांच्याकडून बाजार समिती सभापती जगदाळेंनी घेतले आश्वासन
रेडा – बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना राज्यस्तरावर काम करण्याची भाजपने संधी द्यावी, अशी जाहीर मागणी केल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित हजारो शेतकरी, नागरिकांसमोर हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय पुनर्वसन करणारच अशी, ग्वाही दिली. सरकार पाडण्याची गरज नाही हे सरकार आपोआप पडेल, त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांना नक्कीच चांगली संधी दिली जाईल, असे ठोस आश्वासनही पाटील यांनी दिले.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने इंदापूर कृषी महोत्सव 2020 कृषी जनावरे प्रदर्शन घोडेबाजार व डॉग शोचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटी, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पुष्पा रेडके, मदनसिंह मोहिते पाटील, मयूरसिंह पाटिल, पृथ्वीराज जाचक, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, श्रीमंत ढोले, नानासाहेब शेंडे, विलास वाघमोडे, मंगेश पाटील, महेंद्र रेडके, अशोकराव वनवे, रामभाऊ पाटील यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक तसेच शेतकरी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील शेतकरी हा प्रगतशील शेतकरी आहे. शेतकऱ्यांनी उत्पादकता वाढवावी, आधुनिक पद्धतीने शेती करावी. हा पायडा घालण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रगतीचा आलेख उंचावला आहे. शेती, जनावरे, घोडे, गायी यासंदर्भातील वरदान ठरणारे इंदापूर बाजार समितीचे प्रदर्शन आहे. यातून तालुक्याच्या वैभवात भर पडते आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजार समितीच्या माध्यमातून मोठा आधार व न्याय मिळतो आहे.