आमदार रोहित पवार यांच्या “सृजन’ चा पुढाकार
कर्जत – कर्जत – जामखेड तालुक्यातील सुमारे बाराशे विद्यार्थ्यांना सृजनच्या माध्यमातुन जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात आमदार रोहित पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी वर्षानुवर्ष शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. विद्यार्थी तसेच गरजू नागरीकांना शासकीय योजनांची ओळख व फायदे आदींची माहिती देऊन त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचे काम “सृजन’च्या माध्यमातून करण्यात आले आहे.
गरजुंना हक्काच्या योजना मिळवून देण्यासाठी आमदार पवार यांच्या वतीने काही महिन्यांपूर्वी कर्जत – जामखेड मतदारसंघातील लोकांसाठी जातीच्या प्रमाणपत्राची नोंदणी करून घेण्यात आली होती. त्यानुसार हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. सर्व योजना या एकाच छताखाली राबविल्या जात आहेत.
या कार्यक्रमात अधिकारी-कर्मचारी हे तेथेच उपलब्ध होणार असुन विद्यार्थ्यांबरोबरच शेतकऱ्यांनाही योजना मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासनाचे “महाराजस्व अभियान’ लवकरच राबवण्यात येणार असल्याची माहीती आमदार पवार यांनी दिली. समाज कल्याण, कृषी, महसुल, पंचायत समिती, नगर पंचायत, मृद व जलसंधारण अशा अनेक विभागाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचणार आहेत. जात प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमावेळी शासनाच्या सर्व विभागातील अधिकारी, पक्षांचे पदाधिकारी, विद्यार्थी, महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भविष्यात प्रमाणपत्राअभावी एकही व्यक्ती शासकीय योजनेच्या लाभापासुन वंचित राहणार नाही. जनतेच्या कल्याणासाठी शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील काळात हजारो विद्यार्थ्यांना सृजनच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा निश्चय आहे.
रोहित पवार आमदार