कोपरगाव – शिक्षणाची गंगा शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचविणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श वारसा डोळ्यासमोर ठेऊन माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांनी शाळा-महाविद्यालयांना भरीव मदत करून शिक्षणाचे बाजारीकरण होणार नाही याची काळजी घेतली. तीच परंपरा माजी आमदार अशोकराव काळे यांनी पुढे सुरु ठेवली आहे. तोच वसा आणि वारसा घेऊन मी माझी वाटचाल करीत असून शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे केले.
ब्राम्हणगाव येथील जगदंबा शिक्षण मंडळाच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त माध्यमिक विद्यालय ब्राह्मणगाव येथे विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदंबा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भीमराज सोनवणे होते. यावेळी कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कटके उपस्थित होते. वर्धापनदिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या रांगोळी, चित्रकला व कार्यानुभव प्रदर्शनाची पाहणी करून सहभागी विद्यार्थ्यांचे आ. आशुतोष काळे यांनी कौतुक केले. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक विठ्ठलराव आसने, पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे संचालक किसन आहेर, जगदंबा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भीमराज सोनवणे, उपाध्यक्ष अरुण महाजन, सचिव जगनराव आहेर, कार्याध्यक्ष निवृत्ती बनकर, पोलीस पाटील रवींद्र बनकर, ज्ञानदेव गवारे उपस्थित होते.