पिंपरी -ओएलएक्सवर मोबाइल विकणे एका भारतीय सेनेतील सैनिकाला महागात पडले आहे. अज्ञात आरोपीने सैनिकाला क्यूआर कोड स्कॅन करण्यास भाग पाडून त्यांच्या खात्यावरून 19 हजार 508 रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 26) सकाळी पिंपळे गुरव येथे घडली.
दौलत संपतराव बोरकर (वय 35, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहारुना ऐसुब (रा. भाटपूर, राजस्थान) व मोकम निरनसिंग आदिवासी (रा. खैरा, मध्य प्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बोरकर भारतीय सैन्य दलात मेजर म्हणून नोकरीस आहेत. त्यांना त्यांचा मोबाइल फोन विकायचा होता. त्यांनी त्याची ओएलएक्सवर जाहिरात दिली. त्यावरून आरोपीने बोरकर यांच्याशी संपर्क केला. तुमचा मोबाइल फोन विकत घेऊन तुम्हाला पैसे पाठवतो, असे सांगून आरोपींनी बोरकर यांना क्युआर कोड स्कॅन करायला लावला. क्यूआरकोड स्कॅन केल्यास तुम्हाला पैसे मिळतील असे आरोपींनी बोरकर यांना अमिश दाखवले. बोरकर यांनी कोड स्कॅन केला असता आरोपींनी बोरकर यांच्या खात्यावरून 19 हजार 508 रुपये काढून त्यांची फसवणूक केली.