नंतर लग्नसमारंभात एकमेकांशी मारल्या मनसोक्त गप्पा
संगमनेर – राजकारणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपानंतर नुकतेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी संगमनेरमध्ये लग्न समारंभप्रसंगी एकाच मंचावर दिसून आले. विशेष म्हणजे थोरात व विखे पाटील एकाच सोफ्यावरही एकमेकांशेजारी बसलेले पाहायला मिळाले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
संगमनेर तालुक्यातील नामदेव गुंजाळ यांच्या मुलीच्या विवाह सभारंभासाठी या दोन्ही नेत्यांनी शनिवारी संध्याकाळी हजेरी लावली. त्यावेळी बाळासाहेब थोरात आणि विखे चक्क एकमेकांच्या शेजारी एकाच सोफ्यावर बसले. यावेळी या दोघांमध्ये चर्चाही झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र ही चर्चा नक्की कशाबाबत झाली, याबाबत उत्सुकता अद्याप कायम आहे.
थोरात काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार होते. काही भाजप नेत्यांशीही त्यांच्या गाठीभेटी झाल्या, असा दावा विखेंनी प्रसारमाध्यमांसमोर केला होता. मात्र एका लग्नसभारंभात ते दोघेही एकमेकांशी शेजारी बसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
राजकारणात वैरी असणारे समोर आले, तर मित्रत्वाच्या नात्यानं भेटतात, असं म्हटलं जातं. याला साजेसाच हा प्रसंग घडला. मात्र राजकीय वर्तुळात या निमित्ताने अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहे.