मेट्रोची चाचणी होऊ न देण्याचा पिंपरीच्या महापौरांचा इशारा
पिंपरी – नागपूरहून पुणे मेट्रोचे कोच आज पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले. या मेट्रोच्या नावातच पिंपरीचा उल्लेख नसल्याचे दिसून येत आहे. आज उद्घाटनाला गेलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे यांना हा प्रकार लक्षात येताच त्या चांगल्याच संतापल्याचे दिसून आले. पिंपरी-चिंचवड शहराचे नाव न येण्याचे कारण काय हे लवकर मेट्रो प्रशासनाने स्पष्ट करावे तसेच यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्यास मेट्रो चाचणी होऊ न देण्याचा महापौरांनी इशारा दिला आहे.
नागपूरहून पुणे मेट्रोचे कोच आज शहरात दाखल झाले. त्या वेळी कोचवरील कागद न हटवताच महापौर उषा ढोरे यांना पूजन करायला सांगितले. मात्र, याबाबत महापौरांना कोणतीच कल्पना नसल्याने त्यांचा गोंधळ उडाला.
सोबतच मेट्रोच्या नावात पिंपरीचा उल्लेख नसल्याचेही महापौर यांना निदर्शनास येताच त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच मेट्रो प्रशासनाकडे याबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच मेट्रोने याबाबत समाधानकारक उत्तरे दिली नाहीत, तर मेट्रोची चाचणीच होऊ देणार नाही, असा इशारा महापौरांनी दिला आहे. लवकरच पुणेकरांच्या सेवेत मेट्रो दाखल होणार आहे.
दरम्यान, पुणे मेट्रोचे काम सध्या वेगात सुरू असून, या मेट्रोची आता प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे. मेट्रो तीन कोचची असून, एका मेट्रोमध्ये 950 ते 970 प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात.