पुणे – उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमध्ये वाढ झाल्याने राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढू लागला आहे. पुणे शहरात मंगळवारी तापमान 14 अंशांपर्यंत खाली आले होते.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा थंडी वाढू लागली आहे. सोमवारीसुद्धा अनेक ठिकाणी किमान तापमान हे 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक भागांत किमात तापमानात किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात तापमान सरासरीच्या जवळपास आहे. याशिवाय राज्यासह सर्वत्र हवामान कोरडे असल्यामुळेसुद्धा थंडीत वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वात कमी तापमान नगरमध्ये नोंदविले गेले आहे. मंगळवारीसुद्धा नगरमध्ये तापमान 12.5 अंश होते. पुण्यातही गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात घट होत आहे. सोमवारपर्यंत 15 ते 16 अंशापर्यंत असणारे किमान तापमान पुन्हा घटून ते 14.1 अंशांपर्यंत खाली आले. त्यामुळे रात्रीच्यावेळी गारठा जाणवू लागला आहे.