एसटीचा निर्णय : तिकीट न काढणाऱ्यांना दंडासोबत भरावा लागणार 18 टक्के जीएसटी
पिंपरी – “एसटी’तून विनातिकीट प्रवास करताना पकडले गेल्यास, यापुढे केवळ दंडाची रक्कम भरुन भागणार नाही. तर दंडाच्या रकमेवर 18 टक्के वस्तू व सेवाकर (जीएसटी) फुकट्या प्रवाशांना मोजावे लागणार आहेत. त्यामुळे, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांनाही आता जीएसटीचा भार सोसावा लागणार आहे.
शासनाने एक देश एक करप्रमाणी अंतर्गत जुलै 2017 सालापासून वस्तू व सेवा कर प्रणाली संपूर्ण देशात लागू केली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातही जीएसटीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. महाराष्ट्राने करभरणा करण्यामध्ये देशात अव्वल स्थान पटकावले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता एसटी नेही वस्तू व सेवा कर लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता, हा कर चक्क एस.टी महामंडळाकडून लावण्यात येणाऱ्या दंडावरही आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गर्दीचा फायदा घेत एसटीमधून अनेक जण विनातिकीट प्रवास करत असतात. तपासणीत विना तिकीट प्रवास करणारे प्रवासी सापडल्यास एस.टी महामंडळाकडून दंड आकरण्यात येतो. आता, या दंडावरही जीएसटी लावण्याच्या सूचना व्यवस्थापकांनी नियंत्रकांना दिल्या आहेत. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून किमान दंड 100 रुपये किंवा चुकविलेल्या प्रवास भाड्याच्या दुप्पट यापैकी जी रक्कम जास्त असेल ती रक्कम आणि प्रवाशी भाडे वसूल करण्यात येते. आता यापुढे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना याशिवाय 18 टक्के जीएसटीची रक्कमही मोजावी लागणार आहे.