जलशुद्धीकरण केंद्रासाठी होणार दीड हजार वृक्षांची कत्तल

चिखलीत दोन हजार झाडे लावणार : महापौर जाधव

पिंपरी – चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्राच्या कामासाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांपेक्षा जास्त म्हणजे दोन हजार झाडे चिखली परिसरात लावण्यात येतील, असे महापौर राहुल जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या पिंपरी-चिंचवड शहरात दररोज 480 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जात आहे. हे पाणी अपुरे पडत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. शहरासाठी आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून एकूण 267 दशलक्ष लिटर इतके पाणी उचलण्याचे नियोजन आहे. भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी हे पाणी उचलण्यात येणार आहे. त्यासाठी चिखली येथे महापालिकेकडून जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. या जलशुद्धीकरण केंद्रासाठी महापालिकेला चिखली गायरानाची जागा मिळाली आहे. केंद्र उभारणीच्या कामासाठी महापालिकेकडून 1 हजार 526 झाडे तोडण्यात येणार आहेत. तर, 227 झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे.

महापालिकेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जाणार आहेत. त्याच्या मोबदल्यात नव्याने काही झाडे लावण्याचे नियोजन आहे का, याबाबत महापौरांना विचारणा केली असता ते म्हणाले की गायरानात 30 ते 40 वर्षांपूर्वीची शेकडो जुनी झाडे आहेत. शासन व गावकऱ्यांनी ते वनीकरण केले आहे. शहराची पाण्याची तहान भागविण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र होणे गरजेचे आहे. त्यामुळे ही झाडे तोडावी लागणार आहेत. तथापि, केंद्रासाठी जेवढी झाडे तोडण्याची गरज आहे तेवढीच झाडे तोडली जातील. तसेच, तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात चिखली परिसरात जिथे-जिथे जागा उपलब्ध होईल तिथे एकूण दोन हजार झाडे लावण्याचे आदेश उद्यान विभागाला दिले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)