नगर – दहशतवाद विरोधी पथकाने नगर एमआयडीसी व नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर फाटा येथे वरिष्ठांच्या आदेशानुसार राबविलेल्या तपास मोहिमेत दोन ठिकाणी भंगार विक्रेत्याच्या दुकानात अनियमितता आढळून आल्याने कारवाई केली आहे.
याप्रकरणी भंगार विक्रेते गोरक्षनाथ ज्ञानदेव आव्हाड (वय- 35 रा. खोसपूरी ता. नगर) यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तर, सैफुल्ला तुराब सय्यद (वय- 35 रा. शनिशिंगणापूर फाटा ता. नेवासा) यांच्यावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी 29 सप्टेंबर 2019 पासून जारी केलेल्या आदेशानुसार दहशतवाद विरोधी पथकाकडून जिल्ह्यातील भंगार विक्रेते, हॉटेल, लॉज, नेट कॅफे, घरमालक, भाडेकरू यांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
देशात मागील काळामध्ये घडलेल्या दहशतवादी घटना पाहता दहशतवाद्यांनी बॉम्ब तयार करण्यासाठी जुन्या भंगार साहित्याचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. जिल्ह्यातील भंगार विक्रेते, प्रिंटिंग प्रेस, ऑफसेट चालक, विस्फोट गोदाम परवाना धारक, जुने दुचाकी व चारचाकी वाहन खरेदी करणारे, शस्त्र व दारूगोळा परवाना धारक हे नियमांचे पालन करतात की नाही यासाठी दहशतवाद विरोधी पथकाकडून तपासणी केली जात आहे.
गुरुवारी (दि.14) दहशतवाद विरोधी पथकाने जिल्ह्यात तपासणी करत असताना नगर-मनमाड रोडवरील बोल्हेगाव फाट्यावर असलेल्या अंबिका स्क्रॅप मर्चंट हे भंगार दुकान व शनिशिंगणापूर फाट्यावर सय्यद यांचे भंगार दुकानाची तपासणी केली. दुकानात कोणत्याही प्रकारचे खरेदी-विक्री रजिस्टर, पावत्या, बील मिळून आले नाही.
भंगार माल कोणाकडून खरेदी केला, याची माहिती नसल्याने दहशतवाद विरोधी पथकाने दुकान मालकवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाने केली.