गोंदवले – शिंगणापूर येथील मुख्य बसस्थानक ते शंभू महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. साइडपट्ट्या मोठ्या प्रमाणात खचल्याने बांधकाम विभाग मात्र या रस्त्याबाबत “हर हर महादेव’ करत असल्याने रस्ता दुरुस्तीसाठी सामाजिक संघटनांसह शिंगणापूर ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्वरित रस्ता दुरुस्त न केल्यास 18 नोव्हेंबरपासून माण तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे यांनी दिला आहे.
शिखर शिंगणापूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून “ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्र आहे. मात्र येथील शंभू महादेव मंदिराकडे जाणारा प्रमुख रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. मंदिराकडे जाणारा होळवस्ती ते महादेव मंदिर रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अंतर्गत आहे. दरवर्षी यात्रेपूर्वी मुरूम भरून या रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभाग गांधारीच्या भूमिकेत असल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.
साइडपट्ट्या एक ते दोन फुटांपर्यंत खचल्याने मंदिराकडे जाणारा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तानंतर मंदिर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांसह सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. साइडपट्ट्या भरून रस्ता दुरुस्त न केल्यास 18 नोव्हेंबरपासून माण तहसील कार्यालयात उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.