कराड – युवकाने येथील नव्या कोयना पुलावरून नदीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह जुन्या कोयना पुलाजवळ सायंकाळी पोलिसांना आढळून आला. दरम्यान, आत्महत्या केलेल्या युवकाची मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांना ओळख पटू शकली नव्हती. त्यामुळे त्याचे नाव समजू शकले नाही. या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शहरानजिकच्या नव्या कोयना पुलावरून मंगळवारी दुपारी 35 ते 40 वर्षे वयाच्या युवकाने कोयना नदीत उडी घेवून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह नदीपात्रातील पाण्यावर तरंगत जुन्या कोयना पुलापर्यंत गेला. त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी सायंकाळी जुन्या कोयना पूलाजवळ आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मृत युवकाने ठिपक्यांचा पांढरा हाफ शर्ट व हिरव्या रंगाची पॅंट परिधान केली होती. या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.