पाबळ औट पोस्टच्या पोलिसांची कामगिरी
शिक्रापूर – शिरूर तालुक्यातील अनेक ठिकाणी दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असताना एका अट्टल चोरट्यास चोरीच्या तीन दुचाक्यांसह अटक करण्यात शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पाबळ औट पोस्टच्या पोलिसांना यश आले आहे.
एकनाथ देवराम जाधव (रा. वडाची वाडी, ठाकरवस्ती केंदूर, ता. शिरूर) असे या चोरट्याचे नाव आहे. यापूर्वी त्याने अनेक चोऱ्या केल्या असल्याचे सांगितले.
त्याला अटक करून शिरूर न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पाबळ औट पोस्टचे हवालदार राजेंद्र बनकर व पोलीस शिपाई भास्कर बुधवंत हे पाबळ ते केंदूर-चौफुला रस्त्यावर रात्रीच्या सुमारास नाकाबंदी करत असताना त्या ठिकाणी एकनाथ देवराम जाधव हा युवक दुचाकीवरून (एमएच 45 एए 2572) आलाफ त्याला नाकाबंदी करत असलेल्या पोलिसांनी अडवून त्याच्याकडील दुचाकीचे कागदपत्रांची मागणी केली असताना त्याचेकडे कोणतेही कागदपत्र आढळून आले नाही.
पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याच्याकडे सखोल चौकशी केली असताना त्याने ही दुचाकी खोपोली येथून चोरी करून आणली असल्याचे सांगितले. पोलिसांनी जाधवला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असताना त्याने शिक्रापूर, शिरूर पोलीस ठाणे हद्दीत देखील यापूर्वी दुचाक्या चोरी केल्या असल्याचे सांगितले तर त्याच्या घरी जाऊन पोलिसांनी तपासणी केली असताना चोरीच्या दोन दुचाक्या मिळून आल्या आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र बनकर करीत आहे.