अश्विनी कदम यांची प्रचारात आघाडी
सहकारनगर – गेली 15 वर्षे नगरसेविका म्हणून काम करताना, अश्विनी कदम यांनी शहरातील सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य, पर्यावरण क्षेत्रांत केलेल्या विकासकामांमुळे त्यांची स्वतंत्र ओळख आहे. त्या आमदार झाल्यावर पर्वती विधानसभा मतदारसंघाचा हेवा महाराष्ट्राला वाटल्याशिवाय राहणार नाही, अशा भावना पर्वती विधानसभा मतदारसंघातील स्थानिक महिला बचत गट प्रतिनिधी, युवक-युवतींकडून व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान, निवडणूक प्रचारासाठी कदम यांनी मतदारसंघ पिंजून काढला असून प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
याबद्दल कदम म्हणाल्या, नगरसेविका म्हणून शिवशंकर पोटे दवाखानामध्ये डॉ. कदम डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून कमी दरामध्ये आरोग्य सेवा दिली जाते. मराठी भाषेचा अभिमान आणि लहान वयात मुलांना अक्षरओळख होऊन त्यांच्यावर संस्कार होण्यासाठी “अक्षरबाग’सारख्या कल्पक बागेची निर्मिती केली. “ऑक्सिजन पार्क’ उभा करून आरोग्याची नवीन संकल्पना राबवली. सिंहगड रस्त्यावरची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी समांतर रस्ता केला.
सारसबाग येथे स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन तसेच लोकशाही अण्णा भाऊ साठे नाट्यगृहसाठी स्थायी समिती अध्यक्ष असताना निधी उपलब्ध करून दिला. सिंहगड रस्त्यावर छत्रपती शिवाजीराजे भोसले सांस्कृतिक नाट्यगृह उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. स्वामी विवेकानंद शिल्प, पेशवाईसृष्टी सारखे अनेक कल्पक संकल्पना राबवून त्यांनी त्यांच्या प्रभागाचा विकास केला आहे. हीच विकासकामे आपल्याला मतदारांपर्यंत घेऊन गेली आहेत. त्यामुळे प्रचारात मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून मतदार आता आपल्याला आमदार करण्यासाठी इच्छुक असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.