मार्केट यार्डात किरकोळ ग्राहकांना प्रवेश बंद

बाजारघटकांनाही ओळखपत्राशिवाय प्रवेश नाही

पुणे – मार्केट यार्ड भाजीपाला बाजारातील गर्दी रोखण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पोलिसांची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत ओळखपत्राशिवाय बाजार आवारात कोणालाच प्रवेश द्यायचा नाही, तसेच किरकोळ खरेदीदारांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सहपोलीस आयुक्‍त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍त डॉ. संजय शिंदे, उपायुक्‍त नम्रता पाटील, सहायक आयुक्‍त राजेंद्र गलांडे, बाजार समिती प्रशासक मधुकांत गरड तसेच श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ आदी याप्रसंगी उपस्थित होते. मार्केट यार्डातील गर्दीला आवार घालण्यासाठी शेतीमालाची किरकोळ विक्री बंद करण्यात येणार आहे.

ओळखपत्राशिवाय बाजारात कोणालाच प्रवेश देण्यात येणार नाही. आडते, व्यापारी, कामगार, हमाल, तोलणार, टेम्पोचालक, घाऊक खरेदीदार आदींना ओळखपत्र देण्यात येणार आहे.

मार्केट यार्डातील वाहनतळावर ओळखपत्र असल्याशिवाय वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. बाजार आवारातील बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील प्रवेशद्वार क्रमांक 7 मधून टेम्पोचालकांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशद्वार क्रमांक 1 मधून त्यांना बाहेर पडता येणार आहे. शनिवारी आणि रविवारी मार्केट यार्ड पूर्णपणे बंद राहणार आहे.

टाळेबंदीत मार्केट यार्डातील विविध विभाग दिवसाआड पद्धतीने सुरू ठेवण्यात येत होते. सोमवारी बाजारात आणखी गर्दी होण्याची शक्‍यता असल्याने बाजारात फक्‍त ओळखपत्र असणाऱ्या घटकांना प्रवेश देण्यात येणार आहे. सोमवारी पहाटे मार्केट यार्डातील शिवनेरी रस्ता शेतीमाल वगळता अन्य वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

मार्केट यार्डातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी सोमवारी वाहतूक शाखेचे 15 कर्मचारी, तसेच पोलीस ठाण्यातील 30 कर्मचारी बंदोबस्तास ठेवण्यात येणार आहेत. सुरक्षारक्षक तसेच कर्मचारी बंदोबस्तास साह्य करणार आहेत. शनिवारी आणि रविवारी बाजार बंद असल्याने भुसार बाजारात अन्नधान्य घेऊन येणारे ट्रक रांगेत लावण्यात येणार आहेत. सोमवारी दुपारनंतर त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. परराज्यांतून येणाऱ्या ट्रकचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून बाजार समितीकडून उपायोजना करण्यात येणार आहे.
– नम्रता पाटील, पोलीस उपायुक्‍त, परिमंडळ 5

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.