नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील प्रकार; तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल
नगर: कमी मटण खाल्ले म्हणून एकास अंगावर पेट्रोल ओतून दोघांनी पेटवून दिले. संबंधितास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे सोमवारी (दि.14) रोजी सायंकाळी घडला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध जिवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय पोपट जाधव (वय- 48, रा. गुंडेगाव, ता. नगर) असे जखमी झालेल्याचे व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अधीक माहिती अशी की, बापू एकनाथ हराळ, ज्ञानदेव उत्तम कुसळकर (दोघे रा. गुंडेगाव) यांनी सोमवारी (दि.14) रोजी सायंकाळी सात वाजता संजय जाधव यांना जेवणासाठी घरी बोलावले. यावेळी जेवनासाठी मटणाचा बेत करण्यात आला होता. हे तिघे जेवायला बसले असता हारळ व कुसळकर यांनी जाधव यांना जास्त मटण वाढले. मात्र, जाधव यांचे पोट भरल्याने त्यांनी मटण खाण्यास नकार दिला. याचा हाराळ व कुसळकर यांना राग आल्याने त्यांनी जाधव यास मारहाण केली. त्यानंतर त्यांना रामेश्वर मंगल कार्यालयात आणले तेथे त्यांनी जाधव यांच्यावर वार करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. यामध्ये जाधव गंभीर जखमी झाले.
जाधव यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या जबाबावरून दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.