प्रकाश पवार : शिरूरमध्ये प्रचारार्थ गावभेट दौरा
शिक्रापूर – आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना 39 गावांतून सुमारे 50 हजार मतांचे मताधिक्य राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देण्याचा चंग बांधला आहे. त्या दृष्टीने गावोगांव जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहे, अशी माहिती शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व 39 गावांचे राष्ट्रवादीचे नेते प्रकाश पवार यांनी दिली.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील शिरूर तालुक्यातील 39 गावांमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या गाव बैठकीत पवार बोलत होते. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, काकासाहेब पलांडे, मानसिंग पाचुंदकर, सविता बगाटे, सुनिता गावडे, स्वाती पाचुंदकर, केशर पवार, अरुणा घोडे, सविता पऱ्हाड, विश्वास कोहकडे, सुभाष उमाप, सदाशिव पवार, यशवंत पाचंगे, राजेंद्र नरवडे यांच्यासह विविध गावचे पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. माजी सभापती सुभाष उमाप म्हणाले की, शिरूर तालुक्यातील 39 गावे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली.
तेव्हापासून या गावांमध्ये आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विकास गंगा आली. प्रत्येक गावात विकासकामे झाली आहेत. ही गावे माजी केंद्रीय कृषीमंत्री शेतकऱ्यांचे जाणते राजे शरद पवार यांना मानणारी आहेत.
शिरूर पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांनी शेतकरी वर्ग अक्षरक्ष: गर्तेत सापडला आहे. आघाडी सरकारच्या काळात असे कधीही घडले नव्हते.
सरकारच्या चुकीच्या धोरणांमुुळे राज्य, देशातील अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. परिणामी हजारो तरुणांच्या नोकऱ्यांवर गदा आणली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये प्रथमच कांद्यांला यंदा चांगला बाजारभाव मिळाला; परंतु सरकारने लगेचच कांदा निर्यात बंदीचा शेतकरी विरोधातला निर्णय घेतला. परिणामी कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली. त्यामुळे शेतकरी वर्गात सरकारच्या विरोधात असंतोषाचे वातावरण आहे.
शिरूर तालुक्यातील 39 गावांमध्ये आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. त्यामुळे या गावांमधून त्यांना सर्वाधिक मताधिक्य मिळणार आहेत. गुरुवारी (दि. 3) घोडेगाव येथे अर्ज भरण्यासाठी शिरूर तालुक्यातील 39 गावांमधील हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहून वळसे पाटील यांना जाहीर पाठींबा देणार आहेत.
– सूर्यकांत पलांडे, माजी आमदार