औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच अमेरिका दौरा पार पडला. या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधानांना राष्ट्रपिता म्हणून संबोधित केले. दरम्यान, आता यावरून एमआयएमचे प्रमुख असुद्दुदीन ओवेसी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. ट्रम्पसाठी मोदी भारताचे राष्ट्रपिता असतील परंतू, माझ्यासाठी महात्मा गांधीच आमचे राष्ट्रपिता आहेत असे ओवेसी यांनी म्हटले. तसेच तुम्ही शहा असाल पण संविधान बादशहा असल्याचा टोला देखील यावेळी त्यांनी लगावला.
औरंगाबादमधील आयोजित सभेत असद्दुदीन ओवेसी यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला. महात्मा गांधी यांना गोळ्या झाडून मारणाऱ्यांना सत्तेतील लोक हिरो मानतात आणि गांधींचेच नाव घेता, तसेच देशातील जनतेला धोका देण्यासाठी सरकार गांधींचे नाव घेत असल्याचाही आरोप यावेळी ओवेसी यांनी केला.
महात्मा गांधी यांची 150 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणारे लोक गांधींनी दिलेला संदेश का पाळत नाही असा सवालदेखील यावेळी त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी पाकिस्तानकडून भारताला मिळणाऱ्या निझामाच्या खजिन्याचा उल्लेख केला. पाककडून मिळणारे 450 कोटी रुपयांतून औरंगाबादकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावा असेही त्यांनी सरकारला सांगितले.