कराड – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून कराड नगरपालिकेने पिक्सल आर्टमधील गांधीजींचे छायाचित्र बनवून कराडकरांना अनोखी भेट दिली आहे. साधारण बारा बाय बारा फूट असलेल्या या फ्रेमचे वजन 200 किलो आहे. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत कराडात बनविण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटमध्ये या फ्रेमची भर पडली आहे. कराडमधील आर्टीस्ट नितीन भोसले यांच्या संकल्पनेतून व मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आलेली ही फ्रेम नागरिकांच्या औत्सुक्याचा विषय बनली आहे.
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सहभाग घेतल्यापासून पालिकेने विविध संकल्पना राबवित कराड शहराला वेगळा लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वच्छ व सुंदर कराड शहर अशी ओळख बनवित देशात प्रथम क्रमांकाचे बक्षिसही पटकावले आहे. आता 2020 च्या स्पर्धेत पुन्हा एकदा देशात कराडचा डंका वाजविण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने कराडात अनेक ठिकाणी स्लेफ्टी पॉईंट, कारंजे उभारण्यात आले आहेत. या सर्व संकल्पना साकारताना कराडमधील आर्टीस्ट नितीन भोसले यांचे पालिकेस सहकार्य लाभले आहे.
नितीन भोसले हे कराडचेच आर्टीस्ट आहेत. कृष्णा कला महाविद्यालयात पाच वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांचे मन तिथे रमले नाही. त्यांच्यातला कलाकार त्यांना खुणाऊ लागला. त्यांनी त्यांच्या कल्पनेतून अनेक नावीण्यपूर्ण संकल्पना पुणे, मुंबई, अहमदनगर या सारख्या शहरांमध्ये साकारल्या आहेत. आपण इतर शहरांसाठी करतोय पण आपल्या शहराला आपल्या कलेचा काहीच उपयोग होत नाही अशी खंत त्यांना सलत होती. त्यांची कला पाहून कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी कराडसाठी काही संकल्पना राबविण्याबाबत विनंती केली.
भोसले यांनीही त्याला लगेच होकार दिला. यातूनच गत वर्षभरात पालिकेत राजहंस, कोल्हापूर नाक्यावरील आय लव्ह कराड, बारा डबरी परिसरातील बाग या सुंदर कल्पना साकारल्या गेल्या आहेत. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत काही कल्पना राबविण्याबाबत शासन स्तरावरून निर्देश आले होते.
टाकाऊपासून टिकाऊ हा विषय असल्याने भोसले यांनी आईसक्रीमच्या कपपासून महात्मा गांधी यांचे पिक्सल आर्ट असलेली फ्रेम बनविण्याचा विचार केला. तो त्यांनी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी व सर्व पदाधिकारी यांच्यासमोर मांडल्यानंतर सर्वांनी त्याला एकमताने मंजुरी दिली. गांधी जयंतीदिनीच ही फ्रेम उभारण्याचे ठरविण्यात आले. तात्पुरत्या स्वरूपात प्रीतिसंगम बागेवर ही फ्रेम ठेवण्यात येणार असून कराडच्या वैभवात यामुळे भरच पडली असल्याच्या अनेक नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या.
चार महिन्यांपासून सुरू होते काम
महात्मा गांधीजी यांच्या पिक्सल आर्ट फ्रेमसाठी आइसक्रीमच्या कपचा उपयोग करण्यात आला आहे. सुमारे 2 हजार 116 कप या फ्रेमवर बसविण्यात आले असून रंगकामासाठी मेटॅलिक कलरचा वापर करण्यात आला आहे. गत चार महिन्यांपासून फ्रेम बनविण्याचे काम सुरू होते. तर कप चिकटविण्यासाठी 30 तासांचा कालावधी लागला.
स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत कराड शहरासाठी काहीतरी नावीण्यपूर्ण संकल्पना साकारण्याची मला संधी मिळाली याचे मला समाधान वाटते. शहरात राबविलेल्या संकल्पना लोकांना आवडत आहे. आणखी काही संकल्पना राबविल्या जाणार असून येत्या काही वर्षात कराडला नवी मुंबईचे स्वरूप प्राप्त होईल.
नितीन भोसले आर्टीस्ट, कराड