संगमनेर – राहाता विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात कॉंग्रेसचा उमेदवार आमच्या कुटुंबातील असेल, अशी माहिती युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली. आ. सुधीर तांबे यांनी विखे पाटलांविरोधात निवडणूक मैदानात उतरावे, यासाठी कॉंग्रेस कार्यकर्ते आग्रही असल्याचेही ते म्हणाले.
ते संगमनेर येथे पत्रकारांशी बोलत होते. ना. विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कॉंग्रेसला शह देण्यासाठी थेट संगमनेरच्या राजकारणात सक्रियता दाखवली होती. त्यांनी थोरातांनाच आव्हान दिलं होतं. विखेंचे सुपुत्र खासदार डॉ. सुजय विखेंनी लोकसभा निवडणुकीत थोरातांच्या होम ग्राऊंड संगमनेरमध्येच जोर लावल्याने संगमनेरचे राजकारण चांगलेच तापले आहे. आता विधानसभा निवडणुकीला त्यांच्याविरोधात उमेदवार कोण असा प्रश्न कॉंग्रेससमोर होता.
सुरुवातीला सत्यजित तांबे, त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांची नावे चर्चेत होती. आता शिर्डी विधानसभा निवडणुकीत तांबे विरोधात विखे असा सामना झाल्यास विखे विरुद्ध थोरात या वादाचा नवीन अंक जनतेसमोर येईल हे मात्र नक्की.