विज्ञान विषयासाठी 254 शिक्षकांची पदे मंजूर

पुणे – राज्यातील आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांमध्ये विज्ञान विषयांसाठी 254 शिक्षकांची पदे मंजूर झाली आहेत. यामुळे या आश्रमशाळांसाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आदिवासी क्षेत्रात शिक्षणाचा प्रसार व्हावा या हेतूने शासनाने सन 1972-73 पासून आश्रमशाळा समूह योजना सुरू केली. राज्यात 502 शासकीय व 556 अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येत असल्या तरी सद्यस्थितीत 121 शासकीय व 154 अनुदानित आश्रमशाळांमध्ये उच्च माध्यमिकचे इयत्ता अकरावी, बारावीचे विज्ञान व कला शाखेचे वर्ग चालविण्यात येत आहेत. आदिवासी विकास विभागाने ठरवून दिलेल्या आकृतीबंधानुसार या आश्रमशाळांमध्ये कला शाखेसाठी 4 व विज्ञान शाखेसाठी 3 अशी शिक्षकांची पदे मंजूर झाली आहेत. विज्ञान शाखेसाठी गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र हे विषय शिकविले जातात. सर्व विषयांसाठी स्वतंत्र शिक्षकांची आवश्‍यकता आहे.राज्यातील 111 शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी 111 शिक्षकांची पदे 143 अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी 143 पदांना मान्यता देण्यात आलेली आहे. याबाबतचे आदेश उपसचिव सु. ना. शिंदे यांनी जारी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.