कराड – विधानसभा निवडणुकीतील युती संदर्भातील निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. युती झाल्यास महायुतीच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी शिवसैनिक सज्ज राहतील.
मात्र, वेळप्रसंगी स्वबळावर लढण्याची वेळ आल्यास शिवसेनेचे उमेदवार तयार असून पक्षप्रमुख देतील त्या उमेदवारांच्या पाठीशी शिवसैनिक ठाम राहतील, अशी ग्वाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत शेलार यांनी दिली. दरम्यान, शिवसेनेला स्वबळावर लढण्याची वेळ आल्यास स्थानिक पदाधिकाऱ्यास उमेदवारी देवून त्यास बळ द्यावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.
शिवसेनेच्या कराड दक्षिण तालुका कार्यकारिणीतर्फे विधानसभा निवडणुकीसंदर्भात येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठकीत शेलार बोलत होते. उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, तालुकाप्रमुख नितीन काशीद, शहरप्रमुख शशिराज करपे, जिल्हा संपर्क संघटिका सौ. सुवर्णा शेवाळे, महिला जिल्हा संघटिका चित्रा महाडिक उपस्थित होते. यावेळी दिलीप यादव, संजय चव्हाण, अजित पुरोहित, शेखर बर्गे, विजय तिवारी, राजेंद्र माने यांनी मनोगत व्यक्त केले.