शिरूरमधील 10 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

39 गावांत प्रचार यंत्रणा फिरकू न देण्याचा इशारा


पाण्यापासून वंचित शेतकरी संतापले

– ज्ञानेश्‍वर मिडगुले

सणसवाडी – पिढ्यान्‌पिढ्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शिरूर तालुक्‍यातील 10 गावांतील नागरिक आणि शेतकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शिरूर तालुक्‍यातील 39 गावांत कोणतीही प्रचार यंत्रणा फिरकू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

संविदणे, कान्हूर, मेसाई, खैरवाडी, मिडगुलवाडी, मांदळेवाडी, ढगेवाडी, घोलपवाडी, फलकेवाडी, शास्ताबाद ग्रामस्थांनी शिरूर व आंबेगाव विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकून प्रचार यंत्रणेसही पाटाच्या अलीकडे गावांत फिरकण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

संविदणेहून पोटचारी अगदी उताराने मागणीप्रमाणे येऊ शकते. परंतु डिंभे पाटबंधारे शाखेच्या मंचर येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्र न पाहताच अहवाल दिला आहे. उंच सखल मागास भागासाठी संविदणेहून डिंभा पोटचारीचे काम होण्यासाठी मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, आमदार, खासदारांना निवेदने दिली. त्यांनी पोहोच देऊन प्रकरण निघोटवाडी येथील कुकडी प्रकल्प कार्यालयात कार्यवाहीसाठी पाठवले. वर्षभर दखल न घेता एक दिवसांत उत्तर द्या, असा वरिष्ठांकडून आदेश आल्याने त्यांनी मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत. पोटचारी कामठेवाडीवरून मांदळवाडी खालून पिराचे माळावरून 4 किमीपर्यंत पोटचारी 4 मीटरही खोल न खोदता उताराने सहज जाऊ शकते, असा ढाळ आहे.

अधिकाऱ्यांनी मोघमपणे ब्रिटिशकालीन नकाशा पाहून अशक्‍यप्राय तीर मारला आहे. संविदणे- कवठेचा उर्वरित 40 टक्‍के भाग सोडून लाभ क्षेत्राबाहेरील कान्हूर मेसाई परिसरातील गावांना प्रवाही पद्धतीने पाणी द्या, अशी मागणी मूळ अर्जात नाही. फक्‍त संविदणे-कवठेच्या शिवेवरून पाट गेल्यास त्याशेजारी साठा करून दुष्काळी गावांना पाईपलाइनद्वारे पाणी उचलण्यास सोपे होईल, असे नमूद केले आहे. संविदणेचा गरजू हा वडारवस्ती, नाईकवस्ती, ठाकर-पवार, हरिजन वस्ती आहे. त्यावेळी ओढ्यांमधील मूळ बागायती क्षेत्रातूनच चुकीचे मार्गाने टप्पे पाडत उताराने पाट दामटले आहे. आता त्याच टप्पे दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा खर्च येत आहे. संविदणेचा 40 टक्‍के जिरायती पट्टा शिल्लक राहिला आहे. मूळ पोटचारीची मागणी आहे. हे पाट गेल्यास कान्हूर गावांना पाणी उचलून डोंगरांकडेला टाक्‍या, शेततळे बनवून त्यात पाटाला सोडलेले वाया जाणारे पाणी उचलून साठा करायचा, हा हेतू आहे. उन्हाळ्यात सायफनद्वारे दुष्काळाची तीव्रता कमी करायचा, हा हेतू आहे. संविदणे पोटचारी मागणीप्रमाणे व्हावी, अन्यथा धरणे आंदोलन, उपोषण, रस्ता रोको करण्यात येईल, असा इशारा असा इशारा मयूर कोळेकर, राजू धोत्रे, अमोल लंघे, दत्तू पवार, ग्रामस्थानी दिला आहे.

अपयशी आणि प्रस्तावित योजनांना अपयशाची किनार
संविदणे, कवठे, कान्हूर, मिडगुलवाडी, खैरेनगर, मांदळवाडी ग्रामपंचायतीच्या पत्राप्रमाणे संविदणे डोंगरातून डिंभा कालव्याचे कामठेवाडीवरून मांदळवाडीजवळून पिराचा माळ, लंघे वस्तीवरील बरगाडाने फटांगडे-धोत्रे-कोळेकर दऱ्यातील तळ्यात पोटकालव्याद्वारे पाणी पोहचू शकते. येथपर्यंत सरकारी व खासगी सर्व्हेअरने पाहणी केली आहे. त्यापुढे कवठे ढाकी तलावावरील मुक्‍ताई घाटाच्या खोऱ्यात पाणीसाठा केल्यास वाड्या वस्त्यांनाही 2 किमीवर पाणी उचलणे शक्‍य होईल. संविदणे कवठेच्या उरलेल्या 40 टक्‍के भागाला पाणी मिळेल. पण माथ्यावरील कान्हूर मेसाई, घोलपवाडी, मिडगुलवाडी, ठाकरवाडी, ढगेवाडी, मांदळवाडी, खैरेवाडीच्या 60 टक्‍के उंच भागाला उचल पाणी नेता येईल. ज्या भागाला वर्षातून किमान 6 महिने टॅंकरने सरकारला पाणी पुरवावे लागते. उंचीमुळे या गावांना कळमोडी वा इतरत्रहूनही पाणी पोचणे अशक्‍य आहे. कान्हूर मेसाईची 8 किमी अंतराची मलठणवरून केलेली कोट्यवधींची पाणी योजना चढामुळे अपयशी ठरली आहे.

मिडगुलवाडीचीही 8 किमीवरून घोडनदीचे फत्तेश्‍वर बंधाऱ्यावरून दीड कोटीची पाणी योजना प्रस्तावित आहे. परंतु वीजबिल, देखरेखीचा खर्चही झेपणार नाही. त्यामुळे प्रलंबित आहे. मात्र, संविदणेवरून पोटचारीने कोळेकर वस्तीचे व ढाकीचे मुक्ताई घाट खोऱ्यात पाणी सोडले तर 20 ते 25 लाख रुपयांतही उचल पाणी योजना होणार आहे. तसेच नियोजनाचा भारही कमी होणार आहे. मात्र, कारभारी आणि शासनाची मानसिकता गरजेची आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.