लडाख सीमेजवळ पाकची लढाऊ विमाने तैनात
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावपुर्ण परिस्थिती आहे. त्यातच पाकिस्तानने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेवून स्वत:चीच गोची करून घेतली आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीत आता पाकिस्तानी सैन्याच्या हालचालीत वाढ झाली असून पाकच्या सैन्यातील सशस्त्र जवानांचा ताफा लडाख सीमेजवळ पोहचत आहे. तसेच याठिकाणी पाकची लढाऊ विमानेही तैनात करण्यात आली आहे. शस्त्र घेऊन जाण्यासाठी पाकिस्तानने सी 130 एअरक्राफ्ट्सचा वापर केला आहे. त्यामुळे सीमेवरदेखील तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लडाख हा केंद्रशासित प्रदेश जाहीर केल्यानंतर सीमेवर असणाऱ्या एअरबेसवर शनिवारी पाकिस्तानी वायूसेनेचं सी -130 एअरक्राफ्ट्स काही सामान घेऊन दाखल झाले असल्याचे सरकारी सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. पाकिस्तानकडून सुरु असणाऱ्या हालचालींवर भारतीय गुप्तचर यंत्रणा बारीक लक्ष ठेऊन आहेत. पाकिस्तान सी 130 मालवाहक विमान अमेरिकेकडून काही वर्षांपूर्वी पाकला देण्यात आले होते. पाकिस्तानातील सैन्य कमांडर जिया उल हक याचा मृत्यू ऑगस्ट 1988 मध्ये सी 130 विमान उड्डाणावेळी झाला होता. त्यावेळी विमानात एक बॉम्ब फुटला होता. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानची वायूसेना एक सैन्य अभ्यास करण्यासाठी याठिकाणी आली आहे. या हालचाली त्या प्रात्यक्षित अभ्यास वर्गाचाही भाग असू शकतात. मात्र अनेकदा पाकिस्तानची वायूसेना स्कर्दू एअरबेसचा वापर भारतीय सीमेवर कारवाया करण्यासाठी केला जातो.