अजित पवारांऐवजी जयंत पाटील घेणार मुलाखती
पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यातील विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्षाचे नेते अजित पवार यांच्याऐवजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे घेणार आहेत.
शनिवारी (दि. 27) आणि रविवारी (दि.28) रोजी या मुलाखती निसर्ग मंगल कार्यालयात होणार आहेत. पाटील यांच्यासह आमदार विद्या चव्हाण या मुलाखती घेणार आहेत. 21 विधानसभा मतदारसंघातून सुमारे पावणेदोनशे अर्ज पक्षाकडे आले आहेत. पुणे जिह्यात एकूण 21 विधानसभा मतदारसंघ असून त्यात पुणे शहर-8, पिंपरी-चिंचवड-3 तर जिल्ह्यात 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. यात पुण्यात सुमारे 60 तर पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात सुमारे 110 हून अधिक अर्ज आले आहेत. यात शनिवारी जिल्ह्यातील, तर रविवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड हद्दीतील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत.
सगळे नव्याने मांडावे लागणार
पुणे जिल्ह्यातील राजकारणावर सर्वाधिक पकड असलेले राजकीय नेते म्हणून अजित पवार यांची ओळख आहे. मात्र, या विधानसभेला पवार जिल्ह्यातील उमेदवारांच्या मुलाखलीला येणार नाहीत. 2014 च्या विधानसभेसाठी अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. तर या वेळी पवार हेच मुलाखती घेणार नसल्याने अनेकांची आयत्या वेळी तारांबळ उडाली आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत केलेल्या प्रत्येक कामाची माहिती पवारांपर्यंत पोहोचविण्याची संधी अनेक इच्छुकांनी साधलेली असताना, आता नवीन प्रदेशाध्यक्षांसमोर पुन्हा नव्याने सगळे मांडावे लागणार असल्याने अनेकांची अडचण झाली आहे.