कॉंग्रेसच्या मुलाखतींबाबत जिल्ह्यात संभ्रम

विस्कळीतपणा कायम, इच्छुकांच्या मुलाखतीची तारीख नेत्यांना माहीत नाही

सातारा – एकेकाळी सुवर्ण काळ लाभलेल्या सातारा जिल्हा कॉंग्रेसचा जिल्ह्यात विस्कळीतपणा सुरूच आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसपाठोपाठ कॉंग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा तीन दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र, तीन तारखांपैकी सातारा जिल्ह्यात कोणती तारीख निश्‍चित करण्यात आली, याची माहिती अद्याप पक्षांच्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांपर्यंत पोहचू शकलेली नाही. त्यामुळे मुलाखती होणार पण कधी, असा प्रश्‍न निष्ठावंत कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे.

कॉंग्रेसने राज्यात 29, 30 आणि 31 जुलै रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात किती तारखेला मुलाखती होणार, याची माहिती पक्षाचे पदाधिकारी व ज्येष्ठ नेत्यांपर्यंत पोहचलेली नाही. त्याचबरोबर निरीक्षक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली, याची माहितीही पोहचलेली नाही. वास्तविक जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर कॉंग्रेसची वाताहात होण्यास सुरूवात झाली. आता भाजपने शिरकाव केला असून कोणत्याही परिस्थितीत कराड दक्षिण आणि माण-खटाव विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्याची रणनिती आखण्यात आली आहे. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अन ते खासदार झाले.

घटनेला चार महिने उलटूनही अद्याप कॉंग्रेसला नूतन जिल्हाध्यक्षाची नेमणूक करता आली नाही. अशा परिस्थितीत कॉंग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आखला आहे. मात्र, संघटनेची झालेली पडझड आणि विसंवाद दूर करण्यासाठी कोणताही प्रयत्न होताना दिसून येत नाही. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसच्या मुलाखती किती तारखेला आणि कोणत्या स्थितीत पार पडतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे राहणार आहे. मुळातच ताकद कमी झालेल्या कॉंग्रेस पक्षाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. जिल्हाध्यक्ष नसल्यामुळे पक्षात शिथिलता आली आहे. इच्छुक असले तरी त्यांना प्रोत्साहन कोण देणार हा प्रश्‍न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)