संगमनेर – तालुक्यातील घुलेवाडी शिवारात मांजरीची शिकार करीत असताना मांजरींसह बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घुलेवाडी शिवारात मछिंद्र शिवाजी भोकनळ यांची गट नं 99 मध्ये शेतजमीन असून त्यामध्ये विहीर आहे.
विहिरीचा कृषिपंप चालू करण्यासाठी विहिरीजवळ गेले असता त्यांना विहिरीतून वास येऊ लागला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीत मृत बिबट्या व मांजर आढळून आले. त्यानी तत्काळ वनविभागाला याबाबत माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी व स्थानिकाच्या मदतीने बिबट्याचा मृतदेह विहरीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले तर वनविभागाने घटनेचा पंचनामा केला असून या बिबट्यावर अत्यसंस्कार करण्यात आले आहे.