प्रा. डी. के. वैद्य
अकोले – अकोले तालुक्यात शिवसेने अंतर्गत दोन गटांची गटबाजी उफाळून आलेली असताना एका गटाने उत्तर नगर जिल्हा संपर्कप्रमुख “आ. नरेंद्र दराडे हटाव व शिवसेना बचाव’ असा नारा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची अस्वस्थता आता चव्हाट्यावर आलेली आहे.
आ. नरेंद्र दराडे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अलीकडे भेट घेतली होती.
ठाकरे यांच्याकडे या गटाने अकोले विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडेच राहावा, असा आग्रह धरला, असे सांगण्यात आले. मात्र आ. दराडे यांच्या नेतृत्वाखालील गेलेले शिष्टमंडळ हे विधानसभा मतदारसंघ बचाव या मोहिमेसाठी गेलेले नव्हते, तर ते उत्तर नगर जिल्हा प्रमुख व अकोले, संगमनेर व अन्य तालुक्यांचे तालुकाप्रमुख आपल्या मर्जीतले असावेत, असा बदल करण्यासाठी गेले होते, असा आरोप मुळा विभाग प्रमुख ऍड. संभाजी जाधव यांनी केलेला आहे. त्यांच्या व उपतालुकाप्रमुख प्रभाकर फापाळे यांच्या मते आ. नरेंद्र दराडे हे पक्ष बदलून शिवसेनेत आले आहेत. ते आता शिवसेना पक्ष फोडीत आहेत, असा आरोप करून “आ. दराडे हटाव, शिवसेना बचाव’ असा नारा त्यांनी दिला आहे. शिवसेने अंतर्गत असणारी धुसफूस प्रसारमाध्यमांसमोर आल्यामुळे शिवसेने अंतर्गत गटबाजीची सध्या तालुक्यात खमंग चर्चा सुरू आहे.
दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून आलेले दराडे आता उत्तर नगर जिल्हा प्रमुख म्हणून सर्व सूत्रे हाती घेऊ पाहताहेत. मात्र त्यांचे वर्तन जातीयवादी, पक्ष द्रोही आणि पक्ष फुटीचे असल्याने आ. नरेंद्र दराडे हटाव, अशा प्रकारचा या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. यासंदर्भात लवकरच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे विद्यमान तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ व त्यांचे सहकारी हे मातोश्रीवर जाऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तसेच आ. दराडे हटविल्याशिवाय अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेला यश मिळणार नाही, अशा प्रकारचा इशारा देणार असल्याचे या मान्यवरांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांच्याकडे या सर्वांचा रोख असून, त्यांनीच तालुका पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदी पक्षात फूट पडली आणि पक्ष दोन गटांत विभागण्यातचे काम केले. असे असतानाही ते आता आ. दराडे यांना पुढे करून तालुक्यांमध्ये इतर सर्वसाधारण गटातील होतकरू नेत्यांचे व इतरांचे मनोबल कमी करत आहेत, असा त्यांचा थेट आरोप आहे.संगमनेर शहरामध्येसुद्धा शिवसेनेचे हित जपण्यासाठी संगमनेर शहर शिवसेनाप्रमुख अमर कतारी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यांनी माजी खा. वाकचौरे यांना उघड विरोध केला आणि दुर्दैवाने त्यांची हकालपट्टी शिवसेनेतून झाली. याला कारणीभूत आ. दराडे असल्याचे या नेत्यांनी अप्रत्यक्षरित्या सूचित केले. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे हे संपर्कप्रमुख आता अकोले तालुक्याचे नव्हे तर उत्तर नगर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचे राजकारण गढूळ करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. शिवाय आमदार दराडे हे बाजीराव दराडे यांचा सल्ला घेऊन तालुक्याचे राजकारण बिघडू पाहात असल्याचा त्यांचा आरोप आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शिवसेनेची अकोले शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. तेव्हा आपण सर्वात शेवटी तेथे पोहोचलो असे सांगून उपतालुकाप्रमुख प्रभाकर फापाळे यांनी आपल्याला आपली बाजू मांडू न देता आ. दराडे यांनी तुमच्या गटाचे म्हणणे ऐकून घेतले आहे. आता तुम्हाला बाजू मांडता येणार नाही, असा दावा केला होता. याबाबत ते म्हणाले की ज्या अर्थी मी उशिरा आलेलो होतो तेव्हा मी कोणत्या गटाचा आहे किंवा नाही हे दराडे यांना कसे कळाले आणि जो पक्षप्रमुख असतो किंवा संपर्क प्रमुख असतो त्याने अशा प्रकारची अवमानकारक कृती किंवा भाषा करणे सर्वथा चूक असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांना विधानसभेच्या पूर्वी पदावरून हटवले नाही तर पक्षाची स्थिती लोकसभेच्या उलट राहील, असा होरा त्यांनी व्यक्त केला.