दै. प्रभातच्या वृत्ताचा परिणाम : नगरसेविका सीता हादगे यांचा पुढाकार
वाहतूक पोलिसांकडून धन्यवाद
एस.टी.स्टॅंड समोरील छत्रपती शिवाजी संग्रहालयाचा परिसर प्रचंड वर्दळीचा आहे. त्याचबरोबर परिसरात दुर्गंधी निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत आणि भर पावसात वाहतूक पोलिसांना नियंत्रण करावे लागत होते. मात्र, सोमवारी परिसर स्वच्छ करण्यासह वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे उपस्थित वाहतूक पोलिसांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते व त्याचबरोबर त्यांनी स्वच्छता आणि वृक्षारोपण केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.
सातारा – माजी राज्यपाल जी. डी. तपासे मार्गावरील छत्रपती शिवाजी संग्रहालय परिसरात नगरसेविका सीता हादगे यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण करण्यात आले. नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्यासह पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, बाळासाहेब शिरसट, माजी शिक्षण सभापती राम हादगे, नगरसेवक बाळासाहेब खंदारे, मूकनायक फाउंडेशनचे ओमकार तपासे, राजू जेधे आदी उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजी मंडई, हॉकर्स, सेव्हेनस्टार संकुलातील व्यापाऱ्यांकडून वारंवार कचरा टाकत असल्यामुळे परिसराला दुर्गंधीचे स्वरूप प्राप्त झाले होते. एसटी स्टॅंडला जाणारे प्रवाशी आणि चाकरमाने दुर्गंधीच्या त्रासाला कंटाळले होते. लगत असणाऱ्या माजी राज्यपाल जी. डी. तपासे यांच्या नावाच्या फलकाखाली मोठ्या प्रमाणात कचरा पडत असल्याने या परिसराचे विद्रुपीकरण झाले होते. याबाबतचे सविस्तर वृत्त दैनिक प्रभातने प्रसिध्द केले होते.
अखेर स्थानिक नगरसेविका सिता हादगे यांनी पुढाकार घेत लोकसहभागातून संपूर्ण परिसराची स्वच्छता करत वृक्षारोपण केले. यावेळी नगराध्यक्षा कदम यांनी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावा असे आदेश आरोग्य निरीक्षक प्रवीण साबळे यांना दिले. तसेच लोकांच्या सहभागातून अल्पावधीत राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. अशाच प्रकारे शहरातील इतर ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्याची स्तुत्य संकल्पना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेवटी नगराध्यक्षा कदम यांनी जाहीर केले. यावेळी मनोजकुमार तपासे, बापू सोनमळे, यतीराज कदम, अनिकेत तपासे, बाळासाहेब ढेकणे, संतोष माने, संजय पवार, राजकुमार पाटील आणि नागरिक उपस्थित होते.