आजच्या लढतीबाबत कमालीची उत्कंठा
स्थळ- द ओव्हल मैदान, लंडन
वेळ- दुपारी 3 वाजता
लंडन – दक्षिण आफ्रिकेवरील विजयामुळे मनौधैर्य उंचावलेल्या भारतीय संघाची बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी आज येथे गाठ पडणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील अपराजित्व राखण्याकरिता भारताकरिता ही लढत महत्वाची आहे.
ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या सामन्यांमध्ये विजय मिळविणे सोपे नसते. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान व त्यापाठोपाठ वेस्ट इंडीजविरूध्द खेळाकडे पाहण्याचा व्यावसायिक द्रुष्टीकोन सिध्द केला होता. चेंडू कुरतडण्याच्या आरोपामुळे स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्यावर वर्षभर बंदी घालण्यात आली होती. ही मुदत संपल्यामुळे या दोन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलियाच्या संघात पुन्हा स्थान मिळाले आहे. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. पाच वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. त्यांच्याविरूध्द मायदेशात भारताला एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजय मिळविता आला नव्हता. त्यांच्यावर मात करण्यासाठी कोणती व्यूहरचना करावी, कसे नियोजन करावे हा भारतासाठी जटील प्रश्न असतो.
ऑस्ट्रेलियाचे फलंदाज वेगवान गोलंदाजांविरूध्द फट्केबाजी करण्याबाबत माहीर असले तरीही येथील खेळपट्टी व सध्या भारतीय संघात असलेला दर्जेदार वेगवान गोलंदाजांचा समावेश लक्षात घेता ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना झगडावे लागणार आहे. खुद्द त्यांचे सहाय्यक प्रशिक्षक रिकी पॉंन्टिग यांनाही चिंता वाटू लागली आहे. भारताच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये केवळ एकच फिरकी गोलंदाज असेल व केदार जाधव याचा बदली फिरकी गोलंदाज म्हणून उपयोग केला जाण्याची शक्यता त्यांना वाटत आहे. त्यानुसार ते डावपेच आखत आहेत.
ऑस्ट्रेलियाने भारताबरोबर झालेल्या मालिकेत वर्चस्व गाजविले होते. त्यावेळी त्यांच्या फलंदाजांनी भारताच्या कुलदीप यादव व युझवेंद्र चहल या फिरकी गोलंदाजांविरूध्द भरपूर धावा मिळविल्या होत्या. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरोन फिंच व उस्मान ख्वाजा यांनीही जाधव याला आत्मविश्वासाने तोंड दिले होते. त्यामुळेच अंतिम अकरा खेळाडूंची निवड करणे ही भारताकरिता चिंतेची बाब ठरली आहे.
आफ्रिकेबरोबर झालेल्या लढतीत संधी न मिळालेला मोहम्मद शमी याला आज संघात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. आफ्रिकेबरोबरच्या सामन्यात भुवनेश्वरकुमार याला पहिल्या स्पेलमध्ये यश मिळाले नव्हते, मात्र शेवटच्या महत्वपूर्ण षटकांमध्ये त्याने प्रभावी कामगिरी केली होती. फलंदाजीमध्ये सलामीचा फलंदाज शिखर धवन याला अद्याप अपेक्षेइतका सूर सापडलेला नाही ही भारतासाठी समस्या आहे. मात्र त्याच्याकडे असलेला अनुभव लक्षात घेता त्याचे स्थान अढळ राहण्याची शक्यता आहे.
प्रतिस्पर्धी संघ :
भारत – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल.
ऑस्ट्रेलिया – ऍरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, जेसन बेहनड्रॉफ, अलेक्स केरी (यष्टीरक्षक), नॅथन कोल्टिअर नील, पॅट कमिन्स, नॅथन लायन, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, ऍडम झंपा.