स्थळ : ब्रिस्टॉल
वेळ : दु. 3 वा.
ब्रिस्टॉल – इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर मात देत पाकिस्तानने सर्वांना चकित केले असले तरीही जिगरबाज खेळाडूंचा समावेश असलेल्या श्रीलंकेविरुद्ध विजय मिळविण्यासाठी पाकिस्तानची आज खडतर परीक्षा असणार आहे.
वेस्ट इंडिजकडून लाजिरवाणा पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तानने इंग्लंडवर सनसनाटी विजय मिळविला आहे. त्यांच्यासाठी हा आत्मविश्वास उंचविणारा विजय आहे. पाकिस्तानच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत जवळजवळ साडेतीनशे धावांची मजल गाठली होती. तरीही श्रीलंकेच्या संघात लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्युज, नुवान प्रदीप यांच्यासारखे अनुभवी गोलंदाज असल्यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजांना आक्रमक परंतु सावध खेळ करावा लागणार आहे. त्यामुळेच पाकिस्तानच्या खेळाडूंनी कसून सराव केला आहे.
पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी सांगितले, श्रीलंकेविरुद्ध सामना जिंकणे सोपे नसले तरीही इंग्लंडला पराभूत केल्यामुळे आमच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. शेवटच्या फळीपर्यंत आमच्याकडे फलंदाजी आहे. गोलंदाजीतही विविधता आहे. श्रीलंकेला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी दुसऱ्या लढतीत अफगाणिस्तानला हरविले आहे. ही त्यांच्यासाठी समाधानाची बाजू आहे. श्रीलंकेचे प्रशिक्षक चंडिका हाथरुसिंघे यांनी सांगितले, आमच्या खेळाडूंना पाकिस्तानच्या खेळाडूंचा अभ्यास आहे. त्यामुळे त्यांना वेगळे सांगण्याची गरज पडणार नाही.
प्रतिस्पर्धी संघ :
पाकिस्तान – सर्फराझ अहमद (कर्णधार आणि यष्टीरक्षक), बाबर आझम, आसिफ अली, फखर झमान, हॅरिस सोहेल, हसन अली, इमाद वासिम, इमाम उल हक, मोहम्मद आमीर, मोहम्मद हफीझ, मोहम्मद हसनैन, शदाब खान, शाहीन आफ्रिदी, शोएब मलिक, वहाब रियाझ.
श्रीलंका – दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), धनंजय डिसिल्व्हा, नुवान प्रदीप, अविष्का फर्नांडो, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुशल मेंडिस, जीवन मेंडिस, कुशल परेरा, थिसारा परेरा, मिलिंदा सिरीवर्धने, लहिरु थिरिमाने, इसरु उडाना, जेफ्री व्हॅंडरसे.