पुणे – ताडीवाला रोडवरील पादचारी पुलाखाली एक कोच उभा करण्यात आला होता. आणि प्रत्येक जण कुतूहलाने त्याच्याकडे पाहात होता.. त्याचे कारण होते कोचचे बदललेले रुप.. प्रवाशांसह सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या जुन्या कोचचे रुपांतर तिकीट खिडकीमध्ये करण्यात आले आहे. मध्य रेल्वेमध्ये हा अनोखा बदल करत पुणे विभागाने पहिले स्थान पटकाविले आहे.
जुन्या आणि वापरात नसलेल्या नॅरो गेज कोचचे पुणे विभागाकडून रेल्वे तिकीट कार्यालयात रुपांतर केले आहे. जुना नॅरो गेज कोच क्रमांक सीआर 948 (वशिष्ठ)मध्ये बदल करून हे रुप देण्यात आले. पुणे स्टेशनच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या ताडीवाला रोडच्या येथील पुलाच्या खाली हा कोच वापरून रेल्वेचे आणखी एक तिकीट कार्यालय सुरू झाले आहे. सकाळी सात ते दहा आणि दुपारी दोन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हे तिकीट कार्यालय सुरू राहणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे स्थानक परिसरात चार स्थानकांवर तिकीट खिडक्यांद्वारे अनारक्षित तिकीटे आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासह स्थानकाच्या परिसरामध्ये 19 स्वयंचलित “तिकीट वेंडींग मशीन्स’ आणि चार “कॉईन ऑपरेटेड मशीन्स’ ठेवण्यात आली आहेत.