पिंपरी – नियमबाह्य प्रवासी क्षमता, जादा भाडे, कागदपत्राची पुर्तता न करणे, शासनाचा कर न भरणे आदी कारणामुळे पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाकडून खासगी बसेस व इतर वाहनांवर थेट कारवाई करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यात या विविध कारणामुळे आरटीओ कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. याद्वारे आरटीओ कार्यालयाला 1 लाख 59 हजारांचा दंड वसूल करीत 13 खासगी बस जप्त केल्या आहेत.
शहरात खुलेआम जादा प्रवासी घेवून तथा प्रवाशांकडून आगाऊ भाडे आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स गाड्यावर पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. उन्हाळा सुटीमुळे गावाकडे सुटी घालवायला जाणारांची मोठी संख्या असते याचाच फायदा घेत काही खासगी वाहनांकडून प्रवाशांची लूट केली जाते. याची दखल घेत आरटीओ कार्यालयाने या वाहनांना लक्ष केंद्रीत करत 1 एप्रिल ते 15 मे दरम्यान 45 दिवसांत 99 वाहनांवर कारवाई करत 1 लाख 59 हजार रुपयाचा दंड वसूल केला. कारवाई करण्यात आलेल्या वाहनांमध्ये स्लिपर कोच, सीट बस, व इतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. दोषी आढळलेल्या बस मधील 13 बसे आरटीओ कार्यालयाने जप्त करण्यात आले आहे. तर, दोषी असलेल्या वाहनचालकांचे परवाने निलबिंत करण्यात आले आहे.
प्रवाशांची लूट करणाऱ्या, कागदपत्राची पुर्तता नसणे तथा कर चुकवणाऱ्या वाहनांची यापुढे गय केली जाणार नाही. प्रवाशांकडून नियमानुसार भाडे घेत, प्रवासी क्षमतेची सदर वाहनांनी काळजी घ्यावी, अन्यथा संबधित वाहनांवर दोषी आढळल्यावर चालकांचे परवाने निलंबित केले जातील. येत्या काळात ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल.
आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड