सावळागोंधळ : लाखोंचे वीजबिल माथी मारणाऱ्या यंत्रणेला बसली चपराक
पिंपरी – घरगुती वीज मीटरचे लाखो रुपयांचे बील काढत ग्राहकालाच आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवण्याचा प्रताप महावितरणाच्या चांगलाच अंगलट आला. परस्पर वीज पुरवठा खंडित करू ग्राहकाला अंधारात ठेवणाऱ्या महावितरणला वडगाव दिवाणी न्यायालयाने “फॉल्टी’ ठरविले. विशेष म्हणजे वडगाव सहदिवाणी न्यायालयाचे (कनिष्ठ स्तर) न्यायाधिश पी. एम. सूर्यवंशी यांच्या आदेशानंतर महिना लोटला तरीही महावितरणकडून ग्राहकाच्या घरी मीटरची वीजजोड न करता त्यांना अंधारात ठेवले आहे.
सहा महिन्यांपासून पवार कुटुंब अंधारात
दरम्यान, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाकडून बबन पवार यांनी इलक्ट्रिसिटी अधिनियम 2003 च्या कलम 56 (1) नुसार नोटीस दिली. याशिवाय 17 नोव्हेंबर 2018 घरी कोणीही नसताना बबन पवार यांना घरी जावून मारहण आणि धक्काबुक्की केली आणि घरगुती वापराचे दोन्ही वीजमीटर काढून नेले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दांडगाई करीत वीजमीटर काढून नेल्याची लेखी तक्रार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली आहे. मात्र दोष नसताना गेल्या सहा महिन्यांपासून बबन पवार यांचे कुटुंबीय अंधारात आहे.
मावळ तालुक्यातील मंगरूळ गावाचे बबन मारूती पवार हे रहिवाशी आहेत. त्यांनी 2013 मध्ये घरगुती वापराचे दोन वीजजोड घेतले. या दोन्ही वीज मीटरचे ते नियमित बील रक्कम भरतात. मात्र 2016 मध्ये त्यांचे मीटर बंद पडले. तरीही महावितरणकडून बबन पवार यांना वीजबिल नियमित येत होते. ते बील 2018 पर्यंत ते नियमित भरत होते. मात्र महावितरणकडून 13 एप्रिल 2018 रोजी अचानक एका मीटरचे दोन लाख 15 हजार 251 रुपये आणि 15 मे 2018 मध्ये दुसऱ्या मीटरचे बील एक लाख 70 हजार 944 रुपये असे तब्बल चार लाख 22 हजार 195 रुपये इतके वीजबिल मिळाले.
लाखो रुपयांचे वीजबिल मिळाल्यानंतर वीजग्राहक बबन पवार यांनी रास्ता पेठ (पुणे) येथील महावितरणच्या अंतरिक वाद सामोपचाराने मिटविणे (आयजीआरसी) या संस्थेकडे दाद मागितली. अन्याय होवू नये याकरिता पवार यांनी दोन्ही वीजमीटरच्या स्वतंत्र तक्रारी नोंदविल्या. त्यानंतर “आयजीआरसी’ने पवार यांच्या तक्रारीची दखल घेत दोन्ही मीटरची महावितरण कंपनीने तपासणी पवार यांच्यासमोर करावी आणि मीटर फॉल्टी असतील तर ते बदलण्यात यावेत. तसेच मीटर योग्य असतील तर वीजबिलाची रक्कम ही ग्राहक पवार यांच्याकडून हप्त्या-हप्त्याने वसूल करावी, अशा सूचना दिल्या. मात्र “आयजीआरसी’च्या सूचनेकडे महावितरणने कानाडोळा केला.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज ग्राहक पवार यांच्या गैरहजेरीत दोन्ही वीजमीटरची तपासणी केली. याशिवाय दोन्ही मीटर संशयिरित्या जळालेले असल्याचा खोटा अहवाल “आयजीआरसी’कडे सादर केला. त्यामुळे “आयजीआरसी’ने पवार यांची तक्रार नाकारली. महावितरणच्या दांडगाईनंतर 8 फेब्रुवारी रोजी बबन पवार यांनी वडगाव दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने प्रतिवादी महावितरणला समन्वय बजावले. याशिवाय न्यायालयात बाजू मांडण्याची संधी दिली. तरीही महावितरणचा प्रतिनिधी म्हणून कोणीही न्यायालयात हजर राहिले नाही.
न्यायालयाने वादीचे वकील ऍड. एस. आर. गोयल यांचे म्हणणे ऐकून घेत न्यायाधिश पी. एम. सूर्यवंशी यांनी 4 एप्रिल रोजी एकतर्फी निकाल देत प्रतिवादी महावितरणने वादी बबन पवार यांचे दोन्ही मीटर त्यांच्या राहत्या घरी तात्काळ बसून देण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी, वडगाव न्यायालयाच्या आदेशनंतरही महावितरणकडून पवार यांच्या घरगुती वापराचे वीजमीटर बसविण्यात आले नाही, ही गंभीर बाब समोर आली आहे.
वादी बबन पवार यांनी नियमित वीजबिल भरल्यानंतरही त्यांना 2018 मध्ये लाखो रुपयांचे बील आले. विशेष म्हणजे पवार यांनी “आयजीआरसी’कडे दाद मागितल्यानंतरही त्यांच्यावर अन्याय झाला. अखेर वडगाव दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. महावितरण कंपनीला समन्स आणि बाजू मांडण्याची संधी देऊनही कंपनीकडे कोणीही हजर झाले नाहीत. त्यामुळे वादींच्याबाजूने न्यायालयाने निकाल दिला.
– ऍड. एस. आर. गोयल, वादीचे वकील.