सोसायट्यांमधील पाणी प्रश्न गंभीर; अपुरा पाणीपुरवठा
150 हेक्टरमधील आरक्षणांचा ताबा बाकी
मोशी गावामध्ये विकासकामांसाठी एकूण 54 आरक्षणे टाकली आहेत. त्यांचे एकूण क्षेत्र 224.18 हेक्टर इतके आहे. त्यातील आत्तापर्यंत 73.74 हेक्टरचा ताबा महापालिकेला मिळाला आहे. अद्याप 150.44 हेक्टर जागेचा ताबा बाकी आहे.
पिंपरी – मोशी गावाला नियोजित पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रामुळे वेगळे वलय प्राप्त झाले आहे. गावामध्ये नव्याने झालेल्या गृहनिर्माण प्रकल्पांजवळील रस्ते वगळता अन्यत्र चांगले रस्ते झाले आहेत. संबंधित भागात रस्ते विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे. सोसायट्यांमधील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मागणीच्या तुलनेत अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
मोशीमध्ये आदर्शनगर, गंधर्वनगरी, कोयते वस्ती, मोशी गावठाण, लक्ष्मीनगर उत्तर व दक्षिण, आल्हाटवाडी, बोऱ्हाडेवाडी आदी प्रमुख भागांचा समावेश आहे. परिसराची सध्याची लोकसंख्या सुमारे 40 हजार इतकी आहे. गावामध्ये अंतर्गत रस्त्यांची कामे झालेली आहेत. नव्याने विकसित झालेल्या गृहप्रकल्पांजवळ मात्र, सध्या खडकाळ रस्ते आहेत. गावामध्ये महापालिकेचा दवाखाना उपलब्ध आहे.
तथापि, वाढत्या लोकसंख्येनुसार रुग्णालय उभारण्याची गरज आहे. मोशी परिसरातील विविध भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नव्याने झालेल्या गृहप्रकल्पांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सोसायट्यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. खान्देशनगर, शिवाजीवाडी आदी भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून विकासकामांना खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. उद्यान, सांडपाणी नलिका, अंतर्गत रस्ते, विकास आराखड्यातील नियोजित रस्ते, भाजी मंडई, पेविंहग ब्लॉक आदींची कामे सध्या सुरू आहेत. विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी आवश्यक जागेचा ताबा घेऊन काम सुरू केले आहे. बनकर वस्ती परिसरातील रस्त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. लक्ष्मीनगरमध्ये जलवाहिन्यांची कामे केली जात आहेत.
– लक्ष्मण सस्ते, नगरसेवकमोशीमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी नलिका आदी कामे झाली आहेत. आल्हाटवस्ती येथे खेळाचे मैदान खुले केले आहे. कुदळवाडी येथे विकास आराखड्यातील रस्ता झाला आहे. आरक्षित जागांचा ताबा न मिळाल्याने बहुतांश आरक्षणांचा विकास रखडला आहे. लोकसंख्येनुसार रुग्णालय उभारण्याची गरज आहे.
– मंदा आल्हाट, माजी नगरसेविका