आंध्रा बॅंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; चोरट्यांकडून एटीएम टार्गेट
नगर: चोरट्यांनी घरफोडीनंतर आता एटीएम “टार्गेट’ केले आहेत. केडगावमधील ऑक्सिस बॅंकेचे एटीएम फोडून सुमारे साडेआठ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. तसेच गुलमोहर रोडवरील आंध्रा बॅंकेचे एटीएम वेल्डिंग कटरने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरीत ते यशस्वी होऊ शकले नाहीत. चोरट्यांनी आता एटीएम टार्गेट केल्यामुळे बॅंक व्यवस्थापनाने सुरक्षेत वाढ करण्याची मागणी होत आहे.
याबाबत माहिती अशी की, नगर-पुणे महामार्गावरील केडगाव येथे जलाराम बेकरी जवळ ऑक्सिस बॅंकेचे एटीएम आहे. 12 मे रोजी मध्यरात्री 1.45 ते सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून 8 लाख 38 हजार रुपये लंपास केले आहेत. शेखर विजय भोसले (रा. पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दरम्यान, 8 लाखांची रोकड चोरी होऊनही तब्बल दोन दिवसांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील हे करीत आहेत.
तसेच 14 मे रोजी पहाटेच्या सुमारास गुलमोहर रोडवरील आंध्रा बॅंकेचे एटीएम वेल्डींग कटरने फोडण्याचा प्रयत्न झाल्याचेसमोर आले आहे. याबाबत असिस्टंट मॅनेजर राजेश रमेश पेददाकोटला यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सावेडी रोडवरील ऑक्सिस बॅंकेचे एटीएम फोडण्याचाही प्रयत्न झाला आहे.