कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा बनावट फोटो तयार करून तो सोशल मिडीयावर वापरल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्या प्रियांका शर्मा यांनी या प्रकरणात माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांनी प्रियांका चोप्राच्या एका फोटोवर ममता बॅनर्जी यांचा एक फोटो टाकून एक व्यंग फोटो सादर केला होता व त्यांनी तो सोशल मिडीयावरही टाकला होता. त्यामुळे ममता बॅनर्जीही चांगल्याच भडकल्या होत्या. या प्रकरणात त्यांना नुकतीच अटकही करण्यात आली होती. पण न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे प्रियांका शर्मा यांची सुटका झाली आहे.
आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण त्यांची माफी मागणार नाही असे एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. आपल्या कृत्याचे त्यांनी समर्थनच केले आहे. मला माझ्या कृत्याचा अजिबात खेद वाटत नाही असेही त्यांनी सांगितले. तुरूंगात आपला छळ करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आपल्याशी तुरूंग अधिकाऱ्यांनी एखाद्या गुन्हेगारासारखी क्रुर वर्तणुक केल्याचा आरोपहीं त्यांनी केला. त्यांच्या बंधुंनीही असा आरोप केला की सर्वोैच्च न्यायालयाने आपल्या बहिणीला मुक्त करण्याचा आदेश देऊनही तुरूंग अधिकाऱ्यांनी त्यांना कारागृहातून सोडण्यासाठी मुद्दाम एक दिवसाचा विलंब लावला. त्यांना वास्तविक मंगळवारीच कारागृहातून सोडायला हवे होते असे त्यांनी म्हटले आहे.